

कर्जत: शहराचे ग्रामदैवत थोर संत सद्गुरू गोदड महाराजांचा 188 वा संजीवन समाधी सोहळा व पालखी सोहळ्यानिमित्त आज कर्जत शहरात अभूतपूर्व असा भक्तिमय सोहळा पार पडला. या पावन प्रसंगी श्रीक्षेत्र मच्छिंद्रगड येथून मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पवित्र पादुका तब्बल एक हजार वर्षांनंतर प्रथमच गडाच्या खाली आणण्यात आल्या.
श्रीक्षेत्र मांदळी येथील आत्माराम बाबा यांच्या पवित्र पादुकाही या सोहळ्यात सहभागी झाल्या. या दोन्ही पादुका सुंदररीत्या सजवलेल्या रथामध्ये ठेवून कर्जत शहरात भाविकांच्या दर्शनासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मच्छिंद्रनाथ महाराज, आत्माराम बाबा आणि संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या जयघोषाने कर्जत शहर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. गोदड महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय, आत्माराम बाबा की जय, शंकर बाबा की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. टाळ-मृदंगाच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताका फडकावत आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण वातावरण अत्यंत प्रसन्न व पवित्र झाले होते. अखंड नामस्मरण, हरिनाम गजर आणि भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
हजारो भाविक, विद्यार्थी, ग्रामस्थ, मानकरी पुजारी आणि वारकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रत्येकजण देहभान विसरून आनंदाने नाचत, गात या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेत होता. कर्जत शहरात आजपर्यंत कधीही न झालेला असा हा न भूतो न भविष्यती सोहळा ग्रामस्थ व भाविकांच्या संयुक्त सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने संपन्न झाला.
या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कर्जत परिसरातील प्रसिद्ध शिंपी आमटीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ शहर व परिसरातील हजारो भाविकांनी घेतला. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शील केला या भावनेने भारलेले भक्त समाधानाने आणि कृतज्ञतेने या पवित्र दर्शनाचा आनंद घेताना दिसून आले.