

नगर: महापालिकेत तब्बल दोन वर्षांपासून सुरू असलेले प्रशासकराज आज संपुष्टात आले. महापौरपदी ज्योती गाडे व उपमहापौरपदी ॲड. धनंजय जाधव यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाला आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप या वेळी उपस्थित होते. दरम्यान, लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींनी कारभार हाती घेतल्याने शुक्रवारी महापालिका नगरसेवक, नागरिकांच्या गर्दीने दोन वर्षांनंतर प्रथमच गजबजली होती.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर शुक्रवारी महापौर व उपमहापौरपदाची बिनविरोध निवड झाली. महापौर ज्योती गाडे व उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी अत्यंत साध्या पद्धतीने औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. या वेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक अविनाश घुले, राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाश भागानगरे, नगरसेवक मनोज कोतकर, निखील वारे, सुरेश बनसोडे, महेश लोंढे, करण कराळे, पुष्पा बोरुडे, शारदा ढवण, अजय ढोणे, बाळासाहेब पवार आदींसह नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वातावरण भावुक झाले
महापौर ज्योती गाडे यांनी पदभार स्वीकारताना वडील स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींनी त्यांना अश्रू अनावर झाले. याप्रसंगी त्यांनी आपली बहीण शीतल जगताप यांची गळाभेट घेत भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या वेळी महापौर दालनातील वातावरण भावुक झाले होते.
त्या हरकतीला कायद्याचा आधार नाही: डांगे
महापौर आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी असतानाही सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवाराला महापौर केले जात आहे. त्यावर ओबीसी मोर्चाने आक्षेप घेतला होता. त्यावर आज महापौर निवडीनंतर आयुक्त यशवंत डांगे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, संबंधितांनी हरकत चुकीची आहे. यासंदर्भात स्पष्ट कायदा आहे. महापौर पदाचे आरक्षण ओबीसीसाठी आहेत. त्यासाठी ओबीसी प्रमाणपत्र व जातपडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवार खुल्या प्रवर्गातून निवडून आला आहे म्हणून महापौर पदाची निवडणूक लढता येणार नाही असे म्हणणे साफ चुकीचे आहे. त्याला कोणताही कायद्याचा आधार नाही. ते म्हणाले, महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (दि. 6) सकाळी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिका प्रशासनाच्या वतीने नूतन महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन केले आहे. भविष्यात अहिल्यानगर शहरात कचरा व्यवस्थापन, मोकाट कुत्रे, मोकाट जनावरे, अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक हे प्रश्न आहेत. यावर आम्ही नगरसेवकांबरोबर काम करणार आहोत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे आज महापौरपदाची संधी मिळाली. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्व. अरुणकाका जगताप, स्व. आ. शिवाजी कर्डिले आणि दिवगंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले असून, आमचा खंबीर पाठिंबा गेला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रश्नांची सोडवणूक केली जाईल. शहरातील रस्त्याचा प्रश्न बहुतांश मार्गी लागला आहे. मात्र, उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावर आधारित विकासाचा आराखडा तयार करू.
ज्योती गाडे, नूतन महापौर
महापौर ज्योतीताई गाडे व आम्ही सर्वजण एकत्र येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहोत. शहरातील नागरिकांनी भाजप-राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक निवडून देऊन आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास टाकला आहे. आज त्यांच्यामुळे उपमहापौर पदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या विश्वासाला तडू जाऊ देणार नाही. शहरात दररोज पाणी मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर आमचा भर असेल. सर्वांना बरोबर घेऊन चांगले काम करू.
ॲड. धनंजय जाधव, नूतन उपमहापौर
राज्यात एकमेव अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे विराजमान झाल्या. तर, उपमहापौरपदी भाजपचे ॲड. धनंजय जाधव विराजमान झाले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे कोणताही आनंदोत्सव साजरा न करता पदभार घेण्यात आला आहे. अजितदादा यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील 22 सभा रद्द केल्या. तर, प्रचारासाठी एकही व्हिडिओ कार्यकर्त्यांना दिला नाही. त्यामुळे महापौर व उपमहापौर यांनी कोणताही जल्लोष न करता पदभार स्वीकारला असून कामाला सुरुवात केली आहे. ते नक्कीच जनतेच्या हिताकरिता व शहराच्या विकासाकरिता प्रयत्नशील राहतील. दिवंगत अजितदादांनी महापालिका निवडणुकीत विजयानंतर आनंद व्यक्त करीत अभिनंदन केले होते. आज अजितदादा, दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले व स्व. माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या आठवणी ताज्या होत आहेत.
आमदार संग्राम जगताप
महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या युतीची सत्ता आली आहे. राज्यात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव महापौर निवडला गेला आहे, हे दिवंगत अजितदादा पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. आम्ही सर्वजण अजितदादांकडे जाऊन नगर विकासासाठी मोठा निधी आणण्याचा विचार करीत होतो, पण त्यांच्या निधनाने ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरीसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे पाठपुरावा करून मोठा निधी आणू. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आधीच मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत. उपनगरांच्या विकासासाठीही प्राधान्य दिले जाणार आहे. प्रथम विकास आराखडा तयार करून प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील. येत्या तीन महिन्यांत शहराचे व्हीजन डाक्युमेंट तयार करणार आहोत. ते शहरातील सर्व नागरिकांना दाखविण्यात येईल. त्यानुसार विकासकामे करण्यात येतील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर असणार आहे.
डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार