

जामखेड : तालुक्यातील कृषी केंद्रांना शासनाकडून युरियासह विविध रासायनिक खते विक्रीसाठी पॉझ मशीन देण्यात आली आहेत. मात्र, तालुक्यात पॉझ मशीनवर मोठ्या प्रमाणात खतसाठा उपलब्ध असल्याचे दाखवले जात असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यात 58 कृषी केंद्रे असून, त्यानुसार पॉज मशीननुसार 18 डिसेंबरअखेर युरियाचा साठा तब्बल 8 हजार 392 बॅग असल्याचे दिसून येत आहे. तरीही अनेक कृषी केंद्रांवर युरिया उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कृषी केंद्रांमध्ये फेऱ्या मारत आहेत. ऐन रब्बीच्या हंगामात खत न मिळाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
शासनाच्या नियमानुसार खत खरेदी करताना शेतकऱ्यांचे आधार कार्ड पॉझ मशीनशी लिंक असणे तसेच खरेदीवेळी बायोमेट्रिक अंगठा घेणे बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील अनेक कृषी केंद्रचालक या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गोदामात खतसाठा कमी असतानाही ऑनलाईन पॉझ मशीनवर साठा जास्त आहे का? साठा असताना काही कृषी केंद्रे देत नाहीत हे पाहणे तालुका कृषी विभागाचे काम असताना त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
विक्री झाल्यानंतर पॉझ मशीनवरील साठा कमी होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी तो अद्ययावत केला जात नसल्याने साठ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राजकीय नेते निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे. कागदोपत्री उपलब्ध असलेला खतसाठा प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जामखेडमधील विविध कृषी केंद्रांमध्ये जाऊन युरियाची मागणी केली असता, युरिया उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात येते. युरिया मिळावा म्हणून थेट कृषी कार्यालय गाठले व तेथील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, युरियाचा कृत्रिम टंचाई करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांना तात्काळ युरिया उपलब्ध करून देण्यात आला.
ज्ञानदेव तांबे, शेतकरी, सारोळा
युरिया, 8392 बॅगा, डीएपी 2050 बॅगा, एमओपी 906 बॅग, एसएसपी 13167 बॅगा एनपीके 25 हजार 151 बॅगा. इतक्या मोठ्या प्रमाणात खत शिल्लक असल्याचे दाखवले जात असतानाही शेतकऱ्यांना खते न मिळाल्याने संबंधित कृषी केंद्रांवर कृषी विभाग कोणती कारवाई करणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जामखेड तालुक्यात युरिया खताची कोणतीही टंचाई नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. कृषी केंद्रांनी युरिया देण्यास टाळाटाळ करीत असतील, तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन यावेळी कृषी विभागाने केले आहे.