

नगर: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे. उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांचीही धावाधाव सुरू असल्याचे चित्र असतानाच अहिल्यानगरमध्ये शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी महायुती संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. चर्चेच्या पहिल्याच फेरीत महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, महायुतीचा निर्णय घेण्यात आला असला, तरी जागावाटप हा कळीचा मुद्दा मात्र अद्याप चर्चेला आला नसल्याचे सांगण्यात आले.
अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. स्वतंत्रपणे मुलाखती झाल्याने महायुती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र निवडणूक जाहीर होताच तिन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली.
या भेटीत महायुती करण्यावर चर्चा झाली. सर्वांगीण चर्चेनंतर महायुती म्हणून महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुती झाली असली तरी जागावाटपाचा मुद्दा अद्यापही चर्चेत आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जागावाटपाचा फॉर्म्युला नगरमध्ये नव्हे तर राज्य पातळीवरून निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. महायुती झाली असून जागावाटपाबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही.
अनिल मोहिते, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
जागावाटप कळीचा मुद्दा?
गत सार्वत्रिक निवडणुकीनंतरचे बलाबल पाहता शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष होता. त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि भाजप असा क्रम होता. सात वर्षांच्या कालखंडात राजकीय समीकरणे बदलली. राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. महापौर आपलाच अशी तिन्ही पक्षांची राजकीय रणनीती आहे. त्यादृष्टीनेच राजकीय पक्ष पाऊल टाकत आहे. जागावाटपात शिवसेनेने 24 जागांवर दावा केला तरी सेनेच्या दुभागणीनंतर ही मागणी भाजप-राष्ट्रवादी मान्य करतील का? हा प्रश्न आहे.
शिवसेना व भाजपचे प्रमुख नेते आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करत आहेत. सकारात्मक चर्चा सुरू आहे. महायुती निश्चित होईल.
संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
राष्ट्रवादीची विभागणी झाली असली तरी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वच नगरसेवक आजही एकसंघ आहेत. जागावाटपात भाजपची नेहमीच मित्रपक्षांच्या मागे फरफट झाल्याचे आजवर दिसून आले. आता मात्र फरफट होऊ न देता सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. हा सगळा राजकीय सारीपाट पाहता जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरू पाहत आहे.
महायुती म्हणून प्राथमिक चर्चा झाली आहे. आता जागावाटपाच्या बैठका सुरू होतील. महायुती निश्चितपणे होणार.
अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना