

जामखेड : जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत विधानपरिषद सभागृहाबाबत जाहीरपणे अवमानकारक व निंदनीय वक्तव्य केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी सुर्यकांत ऊर्फ नाना हौसराव मोरे (रा. रत्नापुर, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)शी संबंधित आहेत.
दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान, जामखेड येथील जुने तहसील कार्यालयासमोर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत मोरे यांनी विधानपरिषद सभागृहाची रचना, कार्यपद्धती, कायदेनिर्मितीतील भूमिका, सभागृहातील सन्माननीय सदस्य तसेच मा. सभापती यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह, निंदनीय व अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
या वक्तव्यांमुळे विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय व प्रविण दरेकर यांनी विशेष अधिकार भंग व सभागृह अवमानाबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या उपसभापती मा. नीलम गोरे यांनी चौकशी करून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना दिले.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मोरे यांनी विधानपरिषद सदस्य व मा. सभापती यांच्या लौकिकास बाधा आणण्याच्या उद्देशाने, संपूर्ण जाणीवपूर्वक व आरोपयुक्त भाषेत जाहीर सभेत वक्तव्य केले. या वक्तव्यांमुळे केवळ व्यक्तींची बदनामीच नव्हे, तर विधानपरिषद ही घटनात्मक संस्था असल्याने तिच्या प्रतिष्ठेलाही गंभीर धक्का बसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी सुर्यकांत ऊर्फ नाना हौसराव मोरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 356(1) व 356(2) अंतर्गत कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विधानमंडळ, मुंबई येथे या अवमान व विशेष अधिकार भंग प्रकरणावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्राप्त झालेल्या निर्देशांनुसारच ही कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार जामखेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कन्हेरे हे करीत आहेत.
या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांमधील भाषणांवर आता कडक नजर ठेवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.