

शशिकांत पवार
नगर तालुका: पूर्वी ’ज्वारीचे पठार’ म्हणून ओळख असलेल्या नगर तालुक्याने नव्याने ’कांद्याचे आगार’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तालुक्यात लाल, रांगडा तसेच गावरान कांद्याचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन होत असते. तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्य ’मदार’ कांदा पिकावरच अवलंबून असते. डिसेंबर महिन्यातील थंड वातावरणात गावरान कांदा लागवडीला तालुक्यात वेग आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात जलसंधारणाची झालेली विविध कामे यामुळे मोठ्या प्रमाणात जिरायत शेत जमीन सिंचनाखाली आली आहे. तालुक्यातील शेतीला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने संपूर्ण शेती ही पावसाच्या भरवशावर अवलंबून आहे. चालू वर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच बंधारे, नाले, तलाव तुडुंब भरले होते. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. त्यामुळे बहुतांशी भागात मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे.
पाणी उपलब्ध असल्याकारणाने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या गावरान कांद्याची लागवड डिसेंबर महिन्याच्या शेवटला सुद्धा जोरात सुरू आहे. गावरान कांदा वखारीत साठवण्यास योग्य असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल गावरान कांद्याकडे जास्त असल्याचे पहावयास मिळते. लाल कांदा हा काढल्याबरोबर बाजारपेठेत पाठवावा लागतो. आहे त्या बाजारभावात विकावा लागतो. गावरान कांद्याबाबत मात्र बाजारभावाचा अंदाज घेऊन कांद्याची साठवणूक करता येत असल्याने शेतकरी गावरान कांदा लागवडीकडे वळले असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
दोन एकर गावरान कांद्याची लागवड सुरू आहे. साधारणपणे एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. लाल कांद्याच्या मानाने गावरान कांद्याच्या उत्पादनात मोठा फरक पडत असतो. गावरान कांद्याचे उत्पादन व गुणवत्ता चांगली राहते. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कांदा पिकावरच अवलंबून असते.
सुनील ठोंबरे, शेतकरी, जेऊर
जिरायत पट्टा तसेच पर्जन्यछायेचा भाग म्हणून तालुका ओळखला जातो. शेतकऱ्यांसाठी नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते. वातावरणाच्या लहरीपणाचा तसेच बाजारभावाचा फटका नेहमीच शेतकऱ्यांना बसत असतो. पूर्वी जिरायत असणाऱ्या शेतजमिनी शेतकऱ्यांनी विकसित करून सिंचनाखाली आणलेल्या आहेत. त्यामुळे ज्वारीची जागा कांदा पिकाने घेतली आहे. मध्यंतरी गडगडलेले बाजार भाव व खराब हवामानामुळे लाल व रांगडा कांद्याच्या उभ्या पिकात शेतकऱ्यांनी नांगर घातला होता. परंतु गेल्या आठवड्यापासून बाजारात कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
गावरान कांदा लागवडीस इतर कांद्याच्या मानाने खर्च कमी व उत्पादन चांगले मिळत असते. लाल व रांगडा कांदा विविध रोगांच्या विळख्यात सापडत असतो. तसेच लाल कांदा साठवणूक करता येत नाही. त्यामुळे बहुतांशी वेळेस शेतकरी तोट्यात जातो. गावरान कांद्यास अनुकूल वातावरण व बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असतो.
निलेश कासार, शेतकरी, वाळकी
तालुक्यातील जेऊरपट्टा कांदा उत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. वाळकी, चास, देहरे, अकोळनेर, चिचोंडी पाटील, हिंगणगाव, सारोळा कासार, खडकी, रुईछत्तीसी, निंबळक, विळद, आगडगाव, देवगाव, भोरवाडी, कोल्हेवाडी, बाबुर्डी, पांगरमल, तांदळी वडगाव, डोंगरगण, मांजरसुंबा, बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी या पट्ट्यात देखील कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होत असते. पाण्याची उपलब्धता तसेच डिसेंबर महिन्यात केलेल्या कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण राहत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गावरान कांदा लागवड सुरू केली असल्याचे पहावयास मिळते.
डिसेंबर महिन्यात गावरान कांदा लागवड केल्याने सौम्य थंडी असल्याने हवामान अनुकूल असते. थंडीत बाष्पीभवन कमी त्यामुळे पाण्याची बचत होते. तुलनेने रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. कांद्याचा आकार व गुणवत्ता चांगली राहते. कांदा साठवणुकीस योग्य असल्याने बाजार भावाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना विक्री करता येते. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असते.
सुरेखा घोंडगे, सहा. कृषी अधिकारी, कृषी विभाग