

जामखेड: गेल्या अडीच-तीन वर्षापासून जामखेड-सौताडा या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू असून, खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतचा शहरातर्गतचे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर मुरूम टाकल्याने रस्ता निसरडा बनला आहे. त्यामुळे अपघात वाढले असून, आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत. जामखेडकर या रस्त्यामध्ये मरणयांतना भोगताना दिसत आहे. रस्ताकाम करताना ठेकेदाराची मुजोरी वाढली आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे कामाकडे दुर्लक्ष झाल्याने ठेकेदाराची दिरंगाई सुरू आहे. या रस्त्यावर आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून, ठेकेदाराला अजून किती बळी घेणार असल्याचा सवाल नागरिकांनी केला आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार आदी दिग्गज नेते या कामाबाबत चकार शब्द बोलत नाहीत.जामखेड-सौताडा रस्त्यात नेमकं दडलंय काय? लोकप्रतिनिधी देखील याकडे दुलर्क्ष करीत आहेत. त्यामुळे पदाधिकारी, प्रशासनाची, ठेकेदाराची निष्क्रियता चव्हाट्यावर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काम करताना कुठेही सुसूत्रता नाही. सिमेंट नळीच्या वर स्लॅब टाकत असल्याने गटाराचे काम देखील निकृष्ट होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून रखडलेले जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम आजूनही पूर्णत्वाकडे गेले नाही. रस्त्याचे काम रखडलेले असल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या गटारा देखील मागेपुढे होत आहेत. गटाराचे काम एक सरळ रेषेत होणे क्रमप्राप्त आहे. गटाराच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मनसेचा आंदोलनाचा इशारा
खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता हा खोदून ठेवला आहे. त्यामुळे सध्या धुराळा उडत आहे. धूळ उडू नये, म्हणून टँकरने पाणी टाकले जात आहे. परंतु निसरड्या रस्त्यावर आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. त्यामुळे त्या रस्त्याकडे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडेे ठेकेदाराचे दुर्लक्ष
खर्डा चौक ते समर्थ हॉस्पीटल पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असून ते काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या रस्ताकामाकडे आमदार सुरेश धस यांनी जामखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यावर ुख्यमंत्र्यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्याकडेही ठेकेदाराने डोळेझाक केली आहे.