

कोपरगाव: नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलाची दुरावस्था अखेर चव्हाट्यावर आली आहे. पुलाला शनिवारी मोठे भगदाड पडले आहे. पुलावरील मोठ-मोठ्या खड्डयांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जिवाचे रक्षण करुन, प्रवास करावा लागला. २४ वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. आता पुल नेमकं कधी दुरुस्त होणार, यासाठी किती अवधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Ahilyanagar News)
२००४ मध्ये राज्य सते विकास महामंडळातून मनोज स्थापत्य इंजिनिवर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स, पुणे यांच्यामार्फत तब्बल ३ कोटी ६० लाख खर्चुन बांधलेला पूल काही वर्षांतच दुरवस्थेला आला. पुलावरील खोल खड्ड्यांमुळे वाहनांची अक्षरशः चाळण होत होती. रात्री अंधारात खड़े नजरेस न आल्यामुळे वाहने उडणे, नियंत्रण सुटणे व अपघात होण्याची शक्यता वाढली होती. अनेक वाहने खड्डयांमध्ये अडकले होते, तर काही अपघात झाल्याचे वाहन चालक नाराजीने सांगतात.
पुलाच्या दोन्ही बाजूंना लिंब, रुई, वेड्या बाभळी आदी झुडपांचे प्रचंड जंगल निर्माण झाले आहे. यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नव्हती. झाडांच्या मुळांमुळे पुलाच्या संरचनेला धोका पोहोचत आहे, अशी स्थानिकांची तक्रार आहे. वर्षभरापासून सतत मागण्या करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केला, असा आरोप नागरिकांनी केला आहे. नदी पुलावरी वाहतूक बंद केल्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांमधून संतापाची लाट उसळली आहे. पुलाची दुरुस्ती करून, सुरक्षित वाहतूक मार्ग उपलब्ध करा, अशी मागणी होत आहे.
आता तब्बल ७ किलोमीटरपर्यंत वळसा
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा मोठा ताण पुलावर आहे. असे असताना याकामाकडे दुर्लक्ष कसे झवले, याचा छडा लावण्याची गरज आहे, अशी चर्चा सुरू आहे. पुलावरील वाहतूक बंद केल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थी, नागरिक, अनेकांना तब्बल ७किलोमीटर वळसा घालून, संजीवनी, ओसाईबाबा चौफुली व बेट नाका असा नाहक प्रवास करावा लागत आहे.
प्रशासन खडबडून झाले जागे!
संवत्सर पुलाच्या जोडभागाजवळ मोठा खड्डा पडून, लोखंडी जाळी उघडी पडली होती. नागरिकांनी सतत हा मुद्दा मांडूनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे अखेर या पुलावर मोठे भगदाड पडले. आता खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.