

नगर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण आणि मतदार यादी झाली नसतानाही राष्ट्रवादीने इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. आज रविवारी इच्छुकांकडून मुलाखतीसाठी अर्ज भरून घेण्यात आले. नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील भाजपचे दोन तर सावेडीतील काँग्रेस माजी नगरसेवकाने राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी करण्याची तयारी दर्शविली आहे. उमेदवारीच्या मुलाखतीसाठीचा तसा अर्ज राष्ट्रवादीकडे देण्यात आले.(Latest Ahilyanagar News)
महापालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये घोषित होण्याची शक्यता गृहीत धरत राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे. आ. संग्राम जगताप यांच्या निर्देशाने शहरजिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांची चाचपणी केली. शासकीय विश्रामगृहावर सकाळपासून राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारीच्या मुलाखतीसाठी अर्ज भरून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आ. संग्राम जगताप हेही यावेळी उपस्थित होते. नगर शहरातील महापालिकेच्या 17 प्रभागातून दोनशे पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.
राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे समजते. भाजपचे दोघे हे शहराच्या मध्यवर्ती भागातील असून सावेडीत काँग्रेस नगरसेवकानेही उमेदवारी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आलेल्या अर्जाची छाननी सुरू असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.
मंगळवारी मुंबईत अजित पवारांसमोर आढावा!
मंगळवारी मुंबईत पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचा आढावा घेणार आहेत. त्यावेळी नगर महापालिकेची स्थिती सांगण्यात येणार आहे. कोण कोणत्या प्रभागातून इच्छुक आहेत, इच्छुकांची संख्या व त्यांचे जनमत यावर मुंबईतील बैठकीत चर्चा होणार आहे. आरक्षण व प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर पक्षाचे राज्यातील नेते नगरला येतील. तेही इच्छुकांशी संवाद साधतील, त्यानंतर उमेदवारी निश्चित होणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर नगरचा आढावा मांडण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
शनिवारी भाजप-राष्ट्रवादी युतीचे संकेत अन् रविवारी लगेच चाचपणी महापालिकेसाठी भाजप व राष्ट्रवादी समन्वयाने उमेदवारी देतील असे सांगत भाजपचे माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शनिवारी भाजप-राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. शहर विकासासाठी आ. संग्राम जगताप यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट करतानाच महापौर, सभापती पदाच्या संघर्षात पडणार नसल्याचेही सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची चाचपणी केली. त्यात भाजपच्या दोन माजी नगरसेवकांचा समावेश असल्याने पुढे काय व कसे होणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.