

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर परिसरातील सीना नदीची मुख्य उपनदी खारोळी नदीचे जनावरांच्या गोठ्यांमुळे पाणी दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संबंधित गोठ्यांवर तत्काळ कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या दूषित पाण्याची पाहणी ग्रामपंचायततर्फे ग्रामविकास अधिकारी भागुजी मेहेत्रे यांनी केली.
जेऊर परिसरातून सीना व खारोळी या दोन मुख्य नद्या वाहत आहेत. नद्यांवर झालेल्या विविध बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून खारोळी नदीच्या परिसरात झालेल्या जनावरांच्या गोठ्यांमुळे नदीचे, तसेच परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. गोठ्यातील मलमूत्र व शेणखतामुळे परिसरातील पाणी दूषित होत असून, पिण्यायोग्य राहिलेले नाही. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील वर्षी या गोठ्यांबाबत लिगाडे वस्ती येथील नागरिकांनीही तीव्र आक्षेप घेतला होता. खारोळी नदीचे पाणी म्हस्के वस्ती परिसरातील बंधाऱ्यात पूर्णतः दूषित झालेले पहावयास मिळाले. त्यामुळे म्हस्के वस्तीवरील तरुणांनी आक्रमक होत संबंधित गोठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिक व लहान मुले मोठ्या प्रमाणात आजारी पडले असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात आले. संबंधित गोठ्यामुळे शेटे वस्ती, लिगाडे वस्ती, म्हस्के वस्ती, चापेवाडी परिसर, बेल्हेकर, कोथिंबीरे मळा, ठोंबरे मळा परिसरातील पाणी दूषित होत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.
खारोळी नदीचे पाणी पिंपळगाव माळवी तलावात वाहून जात आहे. पिंपळगाव माळवी तलावातून जेऊर गाव व परिसरासाठी पिण्याची जलवाहिनी करण्यात आलेली आहे. त्यामुळे दूषित पाणीच ग्रामस्थांना परत मिळत असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर पिंपळगाव माळवी तलावातून डोंगरगण, मांजरसुंबा गड, धनगरवाडी या गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. तलावातच दूषित पाणी जात असेल, तर नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
परिसरातील पाणी दूषित करणाऱ्या संबंधित गोठ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य गणेश तवले, राजेश म्हस्के, सुनील म्हस्के, प्रणव म्हस्के, राम म्हस्के, गणेश म्हस्के, आकाश म्हस्के, बालू म्हस्के, संदीप म्हस्के, गौरव पाटोळे, प्रमोद म्हस्के, आदित्य म्हस्के, अनिकेत म्हस्के, श्रीराम म्हस्के, आनंद म्हस्के, प्रकाश म्हस्के, सागर म्हस्के, माऊली म्हस्के, वसंत म्हस्के, विकास म्हस्के, बबन म्हस्के,भरत म्हस्के यांच्यासह ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.
...अन्यथा आंदोलन
संबंधित जनावरांच्या गोठ्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खारोळी नदीच्या तीरावर असणाऱ्या विहिरी, कूपनलिका, हातपंप यांचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे संबंधित गोठ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म्हस्के वस्ती येथील तरुणांकडून देण्यात आला आहे.