

Water Shortage in nagar नगर तालुका : उन्हाळ्याच्या तीव्र झळा नगर तालुक्याला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाचे चटके अन् पाण्यासाठी वणवण भटकंती... ओसाड झालेली माळराने... बहुतांशी तलाव कोरडे ठाक, तर विहिरी, कूपनलिकेंनी गाठला तळ, असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. अकरा गावे व 33 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर बाबत प्रशासन सतर्क असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.
नगर तालुक्यात पावसाळ्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात असणार्या जेऊर परिसरात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने या भागातील बहुतांशी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. दक्षिण पट्ट्यातील वाळकी, अकोळनेर, सारोळा कासार, तसेच पश्चिमेकडील चास भागात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने परिसरातील तलाव भरले होते. तसेच चिचोंडी पाटील परिसरातील केळ तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरला होता. जेऊर पट्ट्यात झालेल्या कमी पावसामुळे या भागात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली होती.
जेऊर परिसरातील वाकी तलाव, पिंपळगाव माळवी तलाव, डोणी तलाव, शेटे वस्ती तलाव, इमामपूर पालखी तलाव पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे या परिसरात तालुक्यात सर्वात अगोदर टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला होता. सद्यस्थितीत तालुक्यातील 11 गावे व 33 वाड्या-वस्त्यांवरील 15 हजार 740 नागरिकांची तहान भागविण्यासाठी टँकर धावत आहेत. तालुक्यात फेब्रुवारीतच बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर गावांना पाणीटंचाई भेडसावू लागली होती. जेऊर पट्ट्यातील कांदा उत्पादन तसेच रब्बी पिकांवरही पाणीटंचाईचा परिणाम झाला आहे. बुर्हाणनगर व घोसपुरी पाणीयोजनांवर तालुक्याची तहान भागविणे अवघड झाले आहे.
नगर तालुक्यात शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भौगोलिक दृष्ट्या डोंगर उतारावर वसलेल्या गावांनी पावसाळ्यात लवकर भूजल पातळी वाढते, तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्यास सुरुवात होते. डोंगर उतारावर वसलेल्या गावांना दरवर्षीच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गर्भगिरीच्या डोंगर रांगांवरील गवत पूर्णपणे वाळल्याने माळराने ओसाड झाली आहेत. डोंगर रांगांमधील पाणी आटल्याने वन्यप्राण्यांची देखील पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
तालुक्यात अकरा गावे व 33वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी अद्यापि काही गावांचे नव्याने प्रस्ताव दाखल होत आहेत. जेऊर गावातील वाड्या-वस्त्यांवरसुद्धा पाणीटंचाई जाणवु लागल्याने जेऊर गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नुकताच पंचायत समितीत प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील आणखी काही गावांनी लवकरच टँकर सुरू करावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, सांडवे, दशमीगव्हाण, बाळेवाडी, मदडगाव, कोल्हेवाडी, खांडके, सारोळा बद्दी, अकोळनेर. तसेच तालुक्यातील 33 वाड्या वस्त्या.
प्रशासनाची सतर्कता !
टँकरसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव दाखल होताच गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह प्रांताधिकारी तत्काळ परिस्थितीची पाहणी करून टँकर सुरू करीत आहेत. प्रशासन गावांची तहान भागविण्यासाठी सतर्क असल्याने तालुक्यातून प्रशासनाचे कौतुक होत आहे.