निमोणे: शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांसाठी वरदान ठरलेले चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सद्य:स्थितीत डावा व उजवा ही दोन्ही कालवे पूर्णक्षमतेने सुरू असल्याने धरणात अवघा चार टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मागील 10 वर्षांपासून पावसाचा अंदाज पाहिला, तर जुलैच्या मध्यापर्यंत धरण परिसरात व लाभक्षेत्रात दमदार पाऊस होत नसल्याचे वास्तव आहे. एप्रिलअखेरीसच धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्याने पुढील अडीच ते तीन महिने लाभक्षेत्रासाठी पाणीटंचाईचे असणार आहेत.
दि. 9 एप्रिलपासून घोडचे दोन्ही कालवे सुरू आहेत. घोडच्या डावा कालव्यामुळे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील बहुतांश गावे ओलिताखाली आली आहेत. 54 किलोमीटर लांब असणारा हा कालवा सद्य:स्थितीत 250 ते 300 क्युसेकने चालू आहे, तर उजवा कालवा 100 क्युसेकने सुरू आहे. फेब्रुवारीअखेरीस धरणाखालील पाच कोल्हापूर बंधारे भरून घेण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडले होते. मात्र, सध्या नदीखालचे कोल्हापुरी बंधारे तळाला गेले आहेत.
मे महिन्यापर्यंत पाणी देण्याचे नियोजन हवे
घोड धरण सप्टेंबरअखेरीस पूर्ण क्षमतेने भरले होते. खरीप हंगामात एक व रब्बी हंगामात दोन व चालू आवर्तन धरून घोडमधून चार आवर्तने झाली. मात्र, ऐन टंचाईच्या काळात उपलब्ध पाणीसाठा संपून गेला. रब्बी हंगामातील आवर्तनाचे नियोजन करताना मे महिन्यापर्यंत लाभक्षेत्राला पाणी देण्याचे धोरण ठरवायला हवे होते, अशी शेतकरीवर्गातून भावना व्यक्त होत आहे.
पाण्यासाठी व्यवहारी तोडगा काढणे गरजेचे
ऐन पावसाळ्यात म्हणजेच सप्टेंबरदरम्यान कालवा सल्लागार समितीच्या बैठकी लावून जे काही पाण्याचे लोकप्रियतेसाठी धोरण ठरवले जाते, त्याला मुरड घालून भविष्यात व्यवहारी तोडगा काढला, तरच लाभक्षेत्रातील शेतकरी व शेती वाचेल; अन्यथा दरवर्षीच ऐन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत राहील, हे नक्की.
धरणात 40 टक्के गाळ
7 टीएमसी पाणी साठवणक्षमता असणार्या घोड धरणात सध्या तब्बल 40 टक्के गाळ असल्याचा अहवाल सन 2011 मध्येच मेरी संस्थेने दिला आहे. धरण पूर्णक्षमतेने भरले गेले, तरी धरणात 5.9 टीएमसी एवढाच पाणीसाठा राहतो. त्यातील उपयुक्त पाणीसाठा 4.8, तर मृत साठा हा 1.1 टीएमसी राहत असल्याने घोडचे कागदावरील नियोजन व प्रत्यक्ष वापरातील उपलब्ध पाणी, यात मोठी तफावत आहे.