

water Tanker fraud : नगर : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. आजमितीस 83 गावे आणि 424 वाड्यांतील 1 लाख 64 हजार 394 लोकसंख्येला 96 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईग्रस्त गावांतील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा यंत्रणेने टँकरच्या दररोजच्या खेपा मंजूर केल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांत सरासरी 235 फेर्या होणे अपेक्षित आहेत. मात्र, सरासरी 187 खेपा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शंभर टक्के फेर्या होत नसल्याने काही टंचाईग्रस्त गावांतील महिलांना रिकामे हांडे घेऊन घरची वाट धरावी लागत आहे. टंचाई परिस्थितीत टँकरच्या शंभर टक्के फेर्या व्हाव्यात यासाठी जिल्हा यंत्रणेने नियोजन केले. परंतु या नियोजनावर टँकर चालकांकडून पाणी फिरवले जात असल्याचे दिसत आहे.
दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला दरवर्षी टँकरचा ठेका खासगी वाहतूक संस्थेला दिला जात आहे. टँकर भरण्यासाठी विहिर वा पाणीपुरवठा योजनांचा आधार घ्यावा लागत आहे. टँकर सुरु झाल्यानंतर दररोज टँकरच्या खेपा शंभर टक्के फेर्या होणे गरजेचे आहे. मात्र, फेर्या पूर्ण होताना दिसत नाहीत. खेपाअभावी जनतेला पाण्याशिवाय उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
16 एप्रिल रोजी संगमनेर, अहिल्यानगर, पारनेर व पाथर्डी या चार तालुक्यातील 55 गावे आणि 293 वाड्यांत पाणीटंचाई भेडसावत होती. त्यासाठी 64 टँकर धावत होते. गेल्या दहा दिवसांत मात्र पाणीटंचाईच्या झळा अकोले, शेवगाव, कर्जत व जामखेड आदी तालुक्यांत जाणवू लागल्या. त्यामुळे या तालुक्यांत देखील टँकर धावू लागले आहेत.
आजमितीस 96 टँकरव्दारे आठ तालुक्यांतील जवळपास पावणेदोन लाख जनतेला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एका टँकर संस्थेवर टाकली आहे. यामध्ये खासगी टँकर संस्थेच्या 83 व शासकीय यंत्रणेच्या 13 टँकरचा समावेश आहे. यासाठी जिल्हा यंत्रणेने टँकरच्या दररोज किती खेपा होणे आवश्यक आहे याचे नियम घालून दिले आहेत. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टँकरच्या खेपा शंभर टक्के होत नसल्याचे जिल्हा टंचाई शाखेच्या अहवालात दिसत आहे.
पालकमंत्री दर बैठकीला टंचाईग्रस्त गावांतील प्रत्येकाला पिण्यापुरते पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नियोजन करण्याचे निर्देश यंत्रणेला देत आहेत. यंत्रणेने नियोजन करुनही जनतेपर्यंत टँकर जात नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
23 एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यासाठी 18 टँकरच्या 55 फेर्या अपेक्षित होत्या. या ठिकाणी शंभर फेर्या झाल्याची नोंद आहे. अकोले तालुक्यातील एक गाव आणि 17 वाड्यांसाठी 3 टँकरच्या 11 फेर्या अपेक्षित असताना फक्त 5 फेर्या झालेल्या आहेत. अहिल्यानगर तालुक्यात 10 टँकरच्या 22 फेर्या असताना 19 फेर्याची नोंद झाली आहे. पारनेर तालुक्यात 26 टँकरच्या 74 फेर्या मंजूर होत्या. परंतु या ठिकाणी 71 फेर्या झाल्या आहेत.
शेवगाव तालुक्यात एका टँकरच्या 2 फेर्या होणे अपेक्षित असताना 1 फेरी झाली आहे. पाथर्डी तालुक्यात 28 टँकरच्या 55 फेर्याऐवजी 20च फेर्या झालेल्या आहेत. कर्जत तालुक्यात तीन टँकरच्या 6 फेर्या असताना 5 फेर्या तर जामखेड तालुक्यात 3 टँकरच्या आठ फेर्याऐवजी 4 फेर्या झाल्या आहेत. पारनेर शहराला देखील पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. या ठिकाणी चार टँकरच्या 13 फेर्या मंजूर आहेत. येथे मात्र टँकरच्या शंभर टक्के फेर्या 23 एप्रिल रोजी झालेल्या आहेत.
21 एप्रिल रोजी 84 टँकरच्या सरासरी 226.80 खेपा होणे अपेक्षित आहेत. मात्र, या दिवशी 190 खेपा झाल्याचे दिसत आहे. 22 एप्रिल रोजी 90 टँकरच्या 232.63 खेपा आवश्यक असताना 179 खेपा झाल्याची नोंद आहे. 23 एप्रिल रोजी 244.97 खेपा नमूद होत्या. परंतु यादिवशी 193 खेपा झाल्या आहेत. या तीन दिवसांत सरासरी 235 टँकरच्या फेर्या आवश्यक असताना त्या फक्त 187 झाल्याची नोंद आहे.
कुठे टँकरमध्ये बिघाड... कुठे वीजच गायब
चालक नसणे, टँकरमध्ये अचानक बिघाड होणे, टँकर भरताना वीजच गायब होणे, टँकरचे डिझेल संपणे आदी विविध कारणामुळे खेपा पूर्ण होत नसल्याची कारणे टँकरचालकांकडून सांगितली जात आहेत. सध्या टंचाईग्रस्त गावांतील महिलांना कामधंदा सोडून उन्हात टँकरची वाट पाहात बसावे लागत आहे. अशा परिस्थितीत टँकर न आल्यास महिलांना रिकामे हांडे घेऊन घरची वाट धरावी लागत आहे.