

शशिकांत पवार
नगर तालुका : पिंपळगाव माळवी तलावातील सुरू असलेल्या पाणीप्रश्नाबाबत जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. परिसरातील गावे तहानेने व्याकुळ झाले असताना तलावातून खासगी व्यक्ती अथवा संस्थेला विहीर, कूपनलिका घेण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात येत असल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, अनधिकृत विहीर, जलवाहिनीवर तत्काळ कारवाई करा; अन्यथा उघडून टाकू, असा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे.
जेऊर, धनगरवाडी, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, मांजरसुंभा गड या गावांसाठी पिंपळगाव माळवी तलावातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तलावामध्ये ग्रामपंचायतच्या विहिरी असून, त्यामधून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सद्य परिस्थितीत तलाव पूर्णपणे कोरडाठाक पडला असून, परिसरातील गावांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. बुर्हाणनगर पाणी योजनेचे पाणी पुरत नाही.
पिंपळगाव तलावामध्ये ग्रामपंचायतींच्या असलेल्या विहिरी व कूपनलिका यांची भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, तलावालगतची गावे तहानेने व्याकुळ झाले असताना पालिका प्रशासनाकडून खासगी संस्थेला कूपनलिका घेण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधितांना नियम व अटींचे पालन करून बोअरवेल घेण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. परंतु त्या जागेवर अनधिकृत विहीर खोदून जलवाहिनी टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालिकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलावातील अनधिकृत विहीर अधिग्रहण करून जेऊर ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी ग्रामपंचायततर्फे करण्यात आली आहे. या अनधिकृत विहिरीबाबत पालिका प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन पंचक्रोशीतील ग्रामस्थांची तहान भागवावी, अशी मागणी होत आहे.
तलावातील अनधिकृत विहीर व जलवाहिनीवर तत्काळ कारवाई करावी; अन्यथा ती उघडून टाकण्याचा इशारा डोंगरगणचे माजी सरपंच कैलास पटारे, पिंपळगाव माजी सरपंच संतोष झिने, जेऊर माजी उपसरपंच बंडू पवार, बाबासाहेब तोडमल, आदिनाथ बनकर, श्रीतेष पवार, सचिन म्हस्के, बबलू शिकारे, उपसरपंच संतोष पटारे, अशोक शिकारे, लक्ष्मण वीरकर, विश्वनाथ गुंड, जगन्नाथ वीरकर, छबुराव मते आदींनी दिला आहे.