

कर्जत: उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावरील अविश्वास ठरावावरील आहे. आमच्या गटातील पंधरा जणांना व्हीप बजविलेला आहे. अविश्वास ठरावाच्या बाजूने सर्वांनी समर्थन करावे असा गटनेता म्हणून मी बजविलेला आहे. आमच्याकडे तेरा नगरसेवक आहेत. सर्व तेरा नगरसेवक अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करतील. कोणी व्हीपचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर डिस्कक्वालिफाय अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्व 15 जण अविश्वासाच्या बाजूने मतदान करतील असा मला विश्वास आहे. अशी माहिती गटनेते प्राध्यापक सतीश काका पाटील यांनी दिली.
कर्जत नगरपंचायतमध्ये उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून बुधवारी नगराध्यक्ष छाया सुनील शेलार यांच्या उपस्थितीमध्ये त्यासाठी विशेष सभा होणार आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल करेपर्यंत सर्व 13 नगरसेवक एकत्र होते सर्वांनी सह्याही केल्या आहेत.
मात्र त्यानंतर ताराबाई सुरेश कुलथे व मोनाली ओंकार तोटे यांनी 15 जुलैपूर्वी उपनगराध्यक्षपदी दोघींपैकी एकाचे नाव जाहीर करावे, अशी मागणी करत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली. यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या दोन नगरसेविकांना आणखी चार नगरसेवकांचा पाठिंबा असल्याची सांगण्यात येत आहे.
या संदर्भात माहिती देताना प्राध्यापक सतीश पाटील म्हणाले की, आमचा 15 नगरसेवकांचा अधिकृत गट नोंदवलेला आहे. आणि न्यायालयाने देखील मला गटनेता म्हणून मला मान्यता दिलेली आहे. यामुळे माझा व्हिप सर्वांवर बंधनकारक आहे. दरम्यान, नगरपंचायतीची मुदत अवघे सात महिने राहिली आहे. मात्र व्हीप डावलल्यास आणि त्यामुळे कुणावर कारवाई झाल्यास सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. म्हणूनच आज नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तेरा नगरसेवक एकत्रच
श्री पाटील म्हणाले की, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 13 नगरसेवकांनी नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. नंतर आम्हीबहुमताने छाया शेलार यांची नगराध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला आहे. सर्व तेरा नगरसेवकांनी त्यावर सह्या केल्या असून आजही आम्ही सर्व एकत्रच आहोत. उपनगराध्यक्षपद मिळावे अशी मागणी करणे गैर नाही. प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकविचाराने नवीन उपनगराध्यक्षाची निवड केली जाईल.