

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीचे लोन संगमनेरसह जिल्ह्यात पोहचले आहे. ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने या गुन्हेगारीची पाळेमूळ शोधून त्याचा नायनाट करावा. याप्रश्नी आमदार, नगराध्यक्ष यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यापुढे हा प्रश्न मांडावा, अशी सूचना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात हे श्रीरामपूर नगरपरिषदेत आले असता त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, अण्णासाहेब डावखर, दिलीप सानप आदी उपस्थित होते. त्यानंतर, आकाश दुबय्या यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांचे घरी जावून त्यांनी सांत्वन केले.
यावेळी थोरात म्हणाले, गुन्हेगारी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यासह देशात फोफावत चालली आहे. सरकारनेच यावर कडक धोरण अवलंबवून याचा मुळासकट नायनाट करावा. माझ्या मंत्रिपदाच्या काळात वाळूचे धोरण खूप चांगले होते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण होते. आता मात्र सरकारने वाळूबाबतचे धोरण बदलावे, असेही त्यानी सांगितले.
जिल्हा बँक निवडणुकीबाबत म्हणाले, जिल्हा बँकेसाठी अनेकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहे. आपण अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेले नाहीत. सध्या पक्षाची राज्याची जबाबदारी येऊन पडली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरही लक्ष द्यावे लागत आहे. आताच नगरमध्ये बसुन चालणार नाही. जिल्हा बँकेच्या बाबतीत योग्यवेळी निर्णय घेऊ, असेही त्यानी सांगितले.
दरम्यान, सोनम वांगचूक यांना सरकारने जबरदस्तीने जंतरमंतर येथून हलवले. लडाखमधील जनतेसाठी त्यांचे मोठे काम आहे. वांगचुक यांना राजस्थानमध्ये तुरुंगात डांबण्यात आल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.