

नगर: भोंदू अशोक खरातचे तपासी यंत्रणेला चक्रावून टाकणारे अघोरी कारनामे समोर येत आहे. शिर्डीत चार एकर जमीन खरेदीसाठी खरातच्या खात्यात उद्योजकांनी चार कोटी आरटीजीएसद्वारे वर्ग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, भोंदू खरातच्या युनियन आणि बडोदा बँकेतील खात्यात दोन वर्षांत 20 कोटीचे डिपॉझिट झाल्याचेही समोर आले.
रावसाहेब गोंदकर यांची शिर्डीतील चार एकर जमीन भोंदू खरातने 2023 मध्ये खरेदी केली. 50 कोटींचे बाजारमूल्य असलेली ही जमीन खरातने अवघ्या पाच कोटींत हडपली आहे. गोंदकरला दिलेले पाच कोटी खरातने नाशिकच्या दोन बँकांमधून वर्ग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांनी त्या बँकांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली. शिर्डीतील जमीन खरेदीच्या दोन दिवस अगोदर खरातच्या सिन्नरमधील बँक ऑफ बडोदा व नाशिकमधील युनियन बँक खात्यात चार कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून आले. हे चार कोटी मुंबई, पुणे, नाशिकमधील उद्योजकांनी आरटीजीएसद्वारे वर्ग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दोन वर्षांत खरातच्या या बँक खात्यांवर वीस कोटी रुपयांचे डिपॉझिट करण्यात आल्याचे समोर आले. भोंदू खरातच्या बँक खात्यांत कोटी-कोटींचे डिपॉझिट करणाऱ्या उद्योजकांचा उद्देश काय? कोण आहेत, हे उद्योजक? याचा शोध सुरू असून पोलिस त्यांनाही चौकशीसाठी बोलविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खरातविरोधात श्रीरामपुरातही गुन्हा
भोंदू अशोक खरात विरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पत्रकाराने विरोधात केलेल्या वृत्तांकनामुळे वावी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करत 5 कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस पाठविली होती. स्थानिक पत्रकाराने त्याला दाद न दिल्याने खरातने अनोळखी व्यक्तीमार्फत दोन वेळा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे श्रीरामपुरात दाखल तक्रारीत म्हटले आहे. दत्तात्रय पोपट खेमनर यांनी ही फिर्याद दिली आहे.
समता पतसंस्थेतील 33 खातेदारांची फसवणूक
भोंदू खरात नॉमिनी असलेल्या 57 खातेधारकांच्या 100 खात्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. बुधवारअखेर त्यातील 33 खातेधारकांच्या 60 खात्यांची तपासणी करण्यात आली. संबंधित 33 खातेधारकांनी समतामधील खात्याबाबत अनभिज्ञता व्यक्त करत आर्थिक व्यवहाराची माहिती नसल्याचे जबाब पोलिसांत दिले आहेत. त्यामुळे भोंदू खरातने भक्त असलेल्यांचे पॅन व आधार कार्ड वापरून खाते उघडले आणि त्यातून उलाढाल केल्याचे स्पष्ट होत आहे. समतामधील 24 खातेधारकांच्या 40 खात्यांची तपासणी येत्या दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
शिर्डी पोलिसांना हवा खरातचा ताबा
शिर्डी पोलिसात दाखल विनयभंग आणि सावकारकी, जमीन फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी असलेला अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना हवा आहेे. त्यासाठी शिर्डी पोलिसांनी राहाता न्यायालयात खरातचा ताबा मिळावा, अशी मागणी केली आहे. खरातला ताबा घेतल्यानंतर समता पतसंस्थेसह इतर संस्थांतील आर्थिक व्यवहारांसोबतच कोणी कोणी मदत केली, याची इत्थंंभूत माहिती समोर येणार आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिर्डी पोलिसांनी खरातचा ताबा मागितला असून राहाता न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दोन पतसंस्थांची माहिती निरंक
खरात नॉमिनी असलेल्या बँक खात्यांची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे. राहाता पीपल्स, संत नागेबाबा, बुलढाणा अर्बन आणि स्वामी विवेकानंद पतसंस्थेला पत्र पाठवत पोलिसांनी खरात नॉमिनी असलेल्या खात्याची माहिती मागविली होती. यातील दोन संस्थांनी पोलिसांना निरंक माहिती कळविल्याचे समजते. मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा खाती तपासणी करून अहवाल द्या, तपासात वेगळीच माहिती समोर आली तर खैर नाही, अशा शब्दात सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. खरातचा ताबा मिळाल्यानंतर त्याने कोठे व कोणत्या पतसंस्थेत व्यवहार केले यावर प्रकाश पडणार असल्याने त्यावेळी सत्य बाहेर पडेल असा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे.
बोगस इन्कम टॅक्सची रेड अन् सेटलमेंट
मोठ्या व्यावसायिकांची माहिती काढून भोंदू खरात स्वत:च्या यंत्रणेमार्फत इनकम टॅक्सची धाड टाकण्याचा ‘नवा उद्योग’ करत असे. धाड टाकणारे खरातचेच पंटर असले तरी ते इनकम टॅक्स अधिकारी असल्याचे भासविले जात होते. या बोगस अधिकाऱ्यांनी धाड टाकताच ते तोतया अधिकारीच व्यावसायिकाला भोंदू खरातकडे घेऊन जात. खरात त्या व्यावसायिकांकडून महागड्या पूजा करण्यासोबतच तोतया अधिकारी व व्यावसायिकांत सेटलमेंट करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर येऊ पाहत आहे. आता शिर्डी पोलिसांनी त्या दिशेनेही तपासाची सुरुवात केल्याचे समजते.