

कर्जत: रात्री अपरात्री मोबाईलवर नको ते मेसेज करणे आणि खासगी कारमध्ये बसण्याची बळजबरी करण्यासोबतच कार्यालयीन कामकाजात मुद्दामहून त्रास देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात महिलेने थेट राज्याच्या कृषी विभागाकडे केली आहे. कर्जत तालुक्यातील कृषी विभागाच्या कार्यालयातील या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्जत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर महिलेने केलेल्या गंभीर तक्रारीचे निवेदन राज्य महिला आयोगाकडेही पाठविण्यात आले आहे.
पदोन्नतीनंतर माळशिरस कार्यालयातील रिक्त जागेवर बदली करण्याची विनंती विभागीय कृषी संचालकांकडे करण्यात आली, मात्र त्यांनी कर्जतला बदली दिली. कर्जतला महिला अधिकाऱ्यास पात्रतेनुसार पदस्थापना न देता दुसरेच काम दिले. तेथील वरिष्ठ अधिकारी मुद्दामहून वारंवार मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक आणि कार्यालयाबाहेर भेटण्याचा अट्टहास होत असून त्यांचे वर्तन गैरशोभनीय असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अवाजवी कामाचा ताण आणि वैयक्तिक त्रास देण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हेतूबद्दल तक्रार अर्जात महिला कर्मचाऱ्यांने शंका उपस्थित केली आहे. कर्जत कृषी कार्यालयातील या घटनेने सरकारी कार्यालयात महिला सुरक्षित नसल्याची बाब समोर आली असून त्याची गंभीर दखल घेत चौकशी सुरू असल्याचे समजते. या महिलेची तक्रार प्रस्तुत प्रतिनिधीकडे प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागातील हे कृत्य समोर आले आहे.
मार्च एन्डला हस्तक्षेप!
कर्जत कृषी कार्यालयातील या वरिष्ठाने लेखा विभागात हस्तक्षेप करत स्वत:च बिले तयार करतात अन् शिपायामार्फत थेट कोषागार कार्यालयात जमा करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विभागीय कृषी संचालक कार्यालयातील ‘वरदहस्त’ असल्याचा दबाव टाकून हे वरिष्ठ अधिकारी मनमानी करत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
संबंधित महिला कर्मचाऱ्याने विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
नंदकुमार वाणी, तालुका कृषी अधिकारी कर्जत