

नगर तालुका: तालुक्यातील खारेकर्जुने येथे बिबट्याने बुधवारी सायंकाळी उचलून नेलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह गुरुवारी सकाळी सापडला. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गाव बंद ठेवले आणि बिबट्या जेरबंद होईपर्यंत मुलीवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा बळी जाण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना समजली जात आहे. दरम्यान, वन विभागाच्या आश्वासनानंतर मृत मुलीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसस्कार करण्यात आले.
खारेकर्जुने येथे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास अंगणात खेळत असलेल्या रियांंका सुनील पवार या मुलीला बिबट्याने उचलून नेले होते. ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतला. गुरुवारी सकाळी येथील शाळेच्या मागील बाजूस हिंगणगाव रस्त्यालगत मुलीचा मृतदेह सापडला.
या घटनेच्या निषेधार्थ खारेकर्जुने येथील ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेतली. जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत गाव बंद ठेवण्यात येईल, मुलीचा अंत्यविधी केला जाणार नाही, तसेच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. खारेकर्जुने येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळावी या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यानी तहसीलदार संजय शिंदे यांना दिले.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत आहे. हिंगणगाव, खातगाव, खारेकर्जुने, टाकळी, निमगाव, हमिदपूर अशा परिसरातील गावांमध्ये फिरत आहे. या सर्व परिसरात कामगार वर्ग, विद्यार्थी, शेतकरी वर्ग भीतीदायक परिस्थितीत आहेत. परिसरात अनेक शाळा तसेच महाविद्यालये असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभाग दुर्लक्ष करत असून त्यांची यंत्रणा अपुरी पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात आला.
भविष्यात अशा दुर्घटना वाढू नयेत यासाठी तत्काळ सर्व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावून बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. पीडित कुटुंबाला शासनाकडुन तातडीची मदत मिळावी, अशा मागण्यात त्यांनी केल्या. यावेळी प्रताप शेळके, रामदास भोर, बी. डी. कोतकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नगर तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. आजपर्यंत अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. परंतु प्रथमच बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा बळी गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी शासन पातळीवर तात्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
परिसरात सहा पिंजरे!
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा बळी गेल्यानंतर सदर बिबट्याला पकडण्यासाठी परिसरामध्ये वन विभागाच्या वतीने सहा पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच बिबट शूट करण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली. वन विभागाकडून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत.