

श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल तिसऱ्या दिवशी पहिला आणि एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.(Latest Ahilyanagar News)
काल प्रभाग क्रमांक 16 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज सीमा नितीन हारदे यांनी दाखल केला आहे. या निवडणुकीतील श्रीरामपुरातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
आघाडी आणि उमेदवारांचा घोळ कायम असला तरी इच्छुकांनी आपला प्रचार मात्र सुरू केला आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने यासाठी उमेदवारी मिळावी, म्हणून रस्सीखेच सुरू आहे. श्रीरामपुरात युती-आघाडी होते किंवा नाही, याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झाले नाही. मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळणार, या आविर्भावात अनेकांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. आपल्याला सन्मानजनक जागा मिळाव्यात आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आपल्यालाच मिळावी, असा आग्रह प्रत्येक पक्षाचा आहे. तसे झाले नाही तर प्रत्येकजण स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत आहे.
इच्छुकांना जर उमेदवारी मिळाली नाही तर बंडाळी होण्याची शक्यता असून काहीजण नगराध्यक्ष पदासाठी अपक्षही लढू शकतात, असा राजकीय अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे या चार दिवसात अनेक उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने ऑनलाइन उमेदवारी भरण्यासाठी उमेदवार सायबर, इंटरनेट किंवा ऑनलाइन ठिकाणी जाऊन गर्दी करत आहेत. या चार दिवसात तहसील कार्यालयातही मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.