नगर: महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहरात सावेडी, बोल्हेगाव, तोफखाना, नालेगाव, सारसनगरचा समावेश असलेल्या प्रभागात धमकी, मारहाणीचे प्रकार घडले असतानाच मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना व भाजप उमेदवारांचे समर्थक भिडले. शहरातील कोतवाली व तोफखाना पोलिसात या प्रकरणी वेगवेगळे सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कल्याण रोड, केडगाव परिसराचा समावेश असलेल्या प्रभागात भाजप-सेनेच्या वादाची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
अहिल्यानगर महापालिकेसाठी आज गुरुवारी मतदान होत आहे. निवडणुकीच्या रण पेटले असतानाच अनेक उमेदवारांचे समर्थक हातघाईवर आले. मंगळवारी रात्री नगर-कल्याण रस्ता परिसरात भाजप-शिवसेना उमेदवारांच्या समर्थकांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली. या घटनेत महिला व युवकांसह दोन्ही बाजूचे पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी रात्रीतून धरपकड मोहीम राबवत एका गटाच्या चौघांना अटक केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, दोन्ही गटांतील सुमारे 25 जणांविरुद्ध गुन्हा झाला आहे. पहिली फिर्यादी 42 वर्षीय व्यक्तीने दिली. त्यांच्या फिर्यादीवरून हीरा जाधव, आदेश जाधव, राज जाधव, नीलेश गाडळकर, मनोज गाडळकर, चिकू ऊर्फ श्रीकांत सरोदे, अभिजित दळवी, अक्षय गाडळकर, ऋषिकेश घुले व इतर पाच ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री 12.10 वाजता त्यांचा मुलगा डीपी चौक परिसरात उभा असताना एका कार चालकाने अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलाने बचाव करीत पळ काढला. कारने त्याचा पाठलाग सुरू ठेवला. त्या कारमध्ये हीरा जाधव असल्याचे फिर्यादीच्या भाच्याने पाहिले. दरम्यान, हीरा जाधव याने धमकी दिली. ‘आज वाचलास, पुढे सांभाळून’ असे म्हणत तेथून निघून गेला. काही वेळातच अक्षय गाडळकर व अन्य इसम लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या घरासमोर आले. वाद वाढत असताना मोठ्या टोळक्याने सुयोग पार्कच्या मोकळ्या मैदानात एकत्र येत हल्ला चढवला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आदेश जाधव याने चाकूने फिर्यादीच्या बाजूच्या एकावर, तर राज जाधव याने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेस मारहाण करण्यात आली. त्यावेळी विनयभंग झाल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, दुसऱ्या गटाचे जखमी अभिषेक शंकर दळवी (रा. काटवन खंडोबा रस्ता) यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीत म्हटले की, मंगळवारी रात्री सुयोग पार्क परिसरात तीन दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने त्यांना व त्यांच्या मित्राला अडवले. या टोळक्यातील काही जणांच्या हातात कोयता, लाकडी दांडके व लोखंडी गज होते. ‘आमच्या वॉर्डात येऊ नका, विरोधात गेलात तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत मारहाण करण्यात आली. या वेळी एकाने कोयत्याने पोटावर वार केल्याचा आरोप अभिषेक दळवी यांनी केला आहे. हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोतवाली, तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ चौघांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये हेमंत ऊर्फ हीरा बाबासाहेब जाधव, आदेश सुरेश जाधव, अक्षय अरुण गाडीलकर व ऋषिकेश नितीन घुले यांचा समावेश आहे. पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत प्रचारातील मुद्याची लढाई गुद्यावर असल्याचे दिसून आले. उमेदवाराला धमकावल्याबद्दल आणि निवडणुकीच्या कारणावरून दमबाजी केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात तीन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, कोतवाली पोलिस ठाण्यात उमेदवारांच्या कुटुंबातील सदस्याच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच, निवडणुकीच्या कारणावरून मारहाण केल्याचे कोतवाली पोलिस ठाण्यात सुमारे चार गुन्हे दाखल झाले आहेत.
तोफखाना परिसरात उमेदवार आमने-सामने
महापालिकेच्या निवडणुकीचा खुला प्रचार संपल्यानंतर उमेदवार मंगळवारी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला. मंगळवारी रात्री प्रभाग दहामध्ये दोन प्रतिस्पर्धी उमेदवार आमने सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. शाब्दिक चकमकी झडत असतानाच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे परिसरातील वातावरण निवळले. मात्र, याप्रकरणाची नोंद पोलिसांत नसली तरी त्याची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सावेडीतील दोन घटना
महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना प्रभाग दोनमध्ये एका तरुणास स्टेटस का ठेवले नाही म्हणून मारहाण करण्यात आली. तर, तसेच सावेडी परिसरातही एका उमेदवाराच्या नातेवाईकाने धमकावल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.