

दीपक ओहोळ
नगर : जिल्ह्यातील 4 लाख 29 हजार 824 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली असून, एकूण क्षेत्राच्या 95.59 हेक्टर क्षेत्रावर पेरणीची नोंद झाली. अद्याप कांदा पेरणी सुरु असल्याने रब्बीचा पेरा वाढणार आहे. धरणांत 91 टक्के म्हणजे 46 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टीएमसी अधिकचा साठा आहे. सध्या भूजलपातळी चांगली असल्यामुळे रब्बी हंगाम जोमात असणार आहे.
जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून असते. गेल्या पावसाळयात भंडारदरा, मुळा, निळवंडे, सीना व आढळा आदी मोठ्या धरणांसह नऊ धरणे यंदा ओव्हरफ्लो झाली आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवस आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली.याचा फटका खरीप पिकांना बसला. जवळपास 6 लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. जवळपास आठ लाख शेतकऱ्यांच्या हाती खरीप पिके लागली नाहीत. मात्र, या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात पाणीच पाणी झाले.
शेतात पाणी साचल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी रखडली गेली होती. एकंदरीत रब्बी हंगामाची पेरणीच उशीरा झाली. अद्यापही रब्बी पेरणी सुरुच आहे. कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी ऊस वगळून 4 लाख 49 हजार 667.44 हेक्टर क्षेत्र निश्चित केले. त्यानुसार आतापर्यंत 4 लाख 29 हजार 823 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झालेली आहे. ज्वारी पेरणी उशीरा सुरु झाल्याने यंदा 75 टक्केच ज्वारीचा पेरा झाला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी गव्हाला अधिक पसंती दिली. 119.39 टक्के म्हणजे 1 लाख 53 हजार 369 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झालेली आहे. मकादेखील सरासरीपेक्षा अधिक पेरला गेला. 99 हजार 893 हेक्टरवर हरबरा पेरणी झालेली असून एकंदरीत 4 लाख 29 हजार 525 हेक्टर क्षेत्रावर यंदा अन्नधान्य पिकांची पेरणी झालेली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे धरणांत उपलब्ध भरपूर पाणीसाठा आणि विहिरींची पाणीपातळी लक्षात घेता रब्बी पिकांना यंदा पाणीच पाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रब्बी हंगाम यंदा जोमात असणार आहे.
नगर 100, पारनेर : 78.75, श्रीगोंदा : 84, कर्जत : 87, जामखेड : 97.38, शेवगाव : 126, पाथर्डी : 95.57, नेवासा : 108, राहुरी : 82, संगमनेर : 85, अकोले : 112, कोपरगाव : 131.4, श्रीरामपूर : 100, राहाता : 97.