

नगर : गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आता महापालिकांनंतर होणार असल्याने गट-गणातील इच्छुकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. आता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तब्बल 767 ग्रामपंचायतींचीही मुदत संपणार आहे. मात्र, झेडपी, पंचायत समिती निवडणुका बाकी असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे सध्यातरी ग्रामपंचायत निवडणुकाही लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 2022 पासून प्रशासक राज आहे. प्रारंभी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागतील, असा अंदाज होता. त्यानुसार, इच्छुकांनी गट आणि गणात मोर्चेबांधणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने नगरपालिका अगोदर घेतल्या. आता हा कार्यक्रम आटोपत असताना पुन्हा झेडपी, पंचायत समितीची आशा उंचावली होती, मात्र, आयोगाने अगोदर मनपा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गट आणि गणात तयारी केलेल्या इच्छुकांना आणखी काहीकाळ वेटींगवर थांबावे लागणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका बाकी असताना, आता डिसेंबरमध्ये 14 ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्ह्यातील सुमारे 767 ग्रामपंचायतींच्या मुदत संपत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीपूर्वी संबंधित ग्रामपंचायतींमध्येही नवीन पदाधिकारी येणे अपेक्षित आहेत. असे असताना अजुनही कार्यक्रम सुरू झालेला नाही. ग्रामपंचायतींची वार्ड रचना, वार्ड आरक्षण, मतदार यादी कार्यक्रमाच्या हालचाली दिसत नाही. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अपेक्षित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गावकीची ‘भावकी’ तयारीतच!
ग्रामपंचायतीच्या राजकारणात गावकी आणि भावकी मोठया प्रमाणात पहायला मिळते. येणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांसाठीही थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी गावोगावी भावकीतून अनेकांनी तयारी केली आहे. त्यामुळे गावच्या निवडणुका जेव्हा होतील, तेव्हा त्या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या होणार हे मात्र नक्की!
आठवडाभरात चित्र स्पष्ट होणार
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या 14 ग्रामपंचायतीची यादी प्राप्त केली आहे. आता जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची यादी मागावली आहे. ही यादी आल्यानंतर ती जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली जाणार असून, त्या ठिकाणाहून पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते. आठवडाभरातच याबाबत चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जाते.
डायरी अन कॅलेंडरवर तारखा..
काही इच्छुकांनी आपल्या ग्रामपंचायतीची मुदत कधी संपणार आहे, याच्या तारखा दोन वर्षापासून खिशातील डायरीमध्ये टिपून ठेवल्या आहेत. तर काहींनी ऑक्टोबरमध्येच नवीन वर्षाचे कॅलेंडर घरात आणून त्यावर पेनाने खूना केल्या आहेत. त्यामुळे अनेक गावात इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे पहायला मिळत आहे.