

संगमनेरः मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने समर्पित भावनेतून प्रदीर्घ सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘लिगसी पुरस्कार सोहळा’ थाटात रंगला. वित्त अधिकारी बाळासाहेब हासे व मालपाणी उद्योग समूहाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या अन्य चौघांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ.संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, आशीष मालपाणी, यशवर्धन, जयवर्धन व हर्षवर्धन मालपाणी यांच्यासह समूहाच्या सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
दरवर्षी मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने सर्व विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेला ‘स्नेह मिलन’ कार्यक्रम साजरा होतो. यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना समूहाच्या वतीने प्रदीर्घ सेवेतून दिलेले अमूल्य योगदान, कामाची पद्धत व उच्च नैतिक मूल्य, यातून वारसा निर्माण करणाऱ्या विविध विभागातील वरीष्ठ कर्मचाऱ्यांची निवड करुन त्यांना ‘लिगसी’ हा उद्योग समूहातील अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार देवून गौरवण्यात येते.
यंदा या पुरस्कारासाठी संगमनेरच्या मुख्य कार्यालयातील वित्त अधिकारी बाळासाहेब हासे, ध्रुव ग्लोबल स्कूलचे सचिन जोशी, बांधकाम प्रमुख दीपक पाबळे, पुणे कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी नितीन जाधव व लोणावळा येथील इमॅजिका वॉटरपार्कचे धिमंत बक्षी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
‘उद्योग समूहाची प्रगती केवळ उत्पादन अथवा, त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर आधारित नव्हे तर, ती निष्ठावान- गुणवान कर्मचाऱ्यांच्या योगदानातून साकारते. हासे यांच्यासह पुरस्कारप्राप्तींनी केवळ नियमित कामकाजचं पूर्ण केले असे नव्हे तर, त्यांनी कामातून संपूर्ण मालपाणी उद्योग समूहासाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.
राजेश मालपाणी, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन, संगमनेर.