

नगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देणार असल्याचा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी धडकला आणि महसूल व पोलिस यंत्रणा सतर्क झाली. दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यालयाबाहेर बाहेर काढून बॉम्बशोधक पथकाने इमारतीच्या सहाही मजल्यांवरील कोपरा न कोपऱ्याची सखोल तपासणी केली.
या तपासणीत बॉम्ब किंवा तत्सम कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून न आल्याने पोलिस आणि महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:स्वास टाकला. बॉम्बस्फोटाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी ही अफवाच असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, दुपारी सव्वादोन वाजता कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करीत कामकाजास प्रारंभ केला. दुपारनंतर नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरळीत झाले.
जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या कार्यालयीनवर मेल आयडीवर सकाळी 9.15 वाजता ‘जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत आरडीएक्स बॉम्बद्वारे उडवून देण्यात येणार’ असा ईमेल आढळून आला. त्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिस यंत्रणेला माहिती दिली.
दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास तोफखाना पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश भांबाळ पोलिस ताफ्यासह तसेच बॉम्बशोधक पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर येण्याचे निर्देश देताच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. बॉम्बबाबत माहिती मिळताच कर्मचारी भयभीत होत पटापट बाहेर पडू लागले. खबरदारीचा उपाय व नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिसांनी संपूर्ण कार्यालय रिकामे केले.बॉम्बशोधक पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासास प्रारंभ केला. दुपारी दीडपर्यंत तीन मजल्यांची तपासणी पूर्ण झाली. दुपारी दोन वाजता खरंच काही अनुचित घटना घडेल का या चर्चेने काही कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते.
दुपारी दोनपर्यंत बॉम्बशोधक पथकातील ‘लुसी’ व ‘जंजीर’ या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्बशोधक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीमधील प्रत्येक मजला, जिने, लिफ्ट, पार्किगची तपासणी करीत इमारतीभोवतीचा परिसर पथकाने पिंजून काढला.
या तपासणीत बॉम्बशोधक पथकाला आरडीएक्स बॉम्बबाबत कोणतीही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणा, बॉम्बशोधक पथक तसेच महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत दैनंदिन कामकाजाला प्रारंभ केला.
कार्यालयातून बाहेर पडताच काही कर्मचाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहातील मोकळ्या पटांगणाचा तर काहींनी मेनगेटचा आसरा घेतला. कोणी धमकी दिली. ही धमकी खरी ठरेल की अफवा, अशा गप्पांचा फड कर्मचाऱ्यांत रंगला होता.
जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय 4 आरडीएक्स बॉम्बद्वारे गुरुवारी दुपारी 2 वाजता उडवून दिले जाणार असल्याचा इंमेल जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9.19 वाजता धडकला होता. या ईमेलमध्ये पाकिस्तानी आयएसआय प्रतिनिधी मुस्ताफा अली सय्यद याच्या नावाचा उल्लेख आहे. येथील तपासणीसाठी बॉम्बशोधक पथक, दहशतवादी कारवाई विरोधी पथक व डॉगस्कॉड आदी तीन पथके तैनात करण्यात आली होती. दरम्यान, तो ईमेल कोठून आला याचा तपास सायबर सेलमार्फत करत आहोत, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.