

चिचोंडी शिराळ: राज्यात 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली, तरी शिक्षण विभागाने लागू केलेल्या एक किलोमीटर हवाई अंतराच्या नियमामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या तांत्रिक अटीमुळे गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
शिक्षण विभागाने 17 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. मात्र, आरटीई पोर्टलवर अर्ज भरताना निवासस्थानापासून केवळ 1 किमी अंतरावरील शाळा निवडण्याची सक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात गावे आणि वस्त्या विखुरलेल्या असतात. तिथे एक किमीच्या परिघात शाळा उपलब्ध असणे अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक ठिकाणी शाळा 5 ते 10 किमी अंतरावर आहेत. पोर्टलवर 1 किमीची मर्यादा असल्याने पालकांना प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या शाळांची नावेच दिसत नाहीत. ज्यामुळे अर्ज प्रक्रिया ठप्प झाली आहे.
एक किमीच्या या हवाई अंतराच्या नियमामुळे आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना मोठा फटका बसत आहे. मजूर आणि शेतकरी पालक आपली रोजंदारी बुडवून सेतू केंद्रांवर चकरा मारत आहेत. उत्पन्नाचे दाखले आणि इतर कागदपत्रे गोळा करण्यासाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती पालकांना सतावत आहे.
आम्ही गरीब लोकांनी मुलाला चांगल्या शाळेत शिकविण्याचे स्वप्न पाहिले, पण सरकारने 1 किलोमीटरची अट घालून आमची वाट अडवली आहे.
एक संतप्त पालक