

नगर: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीविरोधात 9 हजार 607 हरकती दाखल आहेत. या हरकतींची दखल महापालिका प्रशासनाने घेणे गरजेचे असून, त्यासाठी 10 डिसेंबरची वाट पाहात आहोत. हरकतींची दखल न घेता अंतिम मतदारयादी प्रसिध्द केल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाईल, असा इशारा अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी दिला आहे. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनावर दबाव टाकून निवडणुकीसाठी आवश्यक त्या बाबी करुन घेत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी महापालिका प्रशासनाच्या वतीने जोरदार सुरु आहे. मतदायादीचा प्रारुप प्रसिध्द केल्यानंतर नागरिक आणि विविध पक्षांच्या वतीने तब्बल 9 हजार 607 हरकती दाखल झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी अहिल्यानगर शहर प्रारुप मतदारयादीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.6) पत्रकार परिषद घेत प्रारुप मतदारयादीत गोंधळ असून, याला जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना जबाबदार असल्याचे सांगितले. दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
कळमकर म्हणाले, अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये 2 लाख 76 हजार 92 मतदार होते. 2019 मध्ये 2 लाख 86 हजार 408 मतदार होते. सरासरी आठ ते नऊ हजार मतदारवाढ ही नैसर्गिक आहे. परंतु 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी 3 लाख 16 हजार 795 मतदारसंख्या होती. गेल्या पाच वर्षांत तब्बल 30 हजार मतदारवाढ झाली. एवढी मोठी वाढ कशी झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना व पक्षाला फायदा होईल अशाच पध्दतीने जेरी मॉडेरिंग पद्धतीने महापालिकेच्या प्रभागांची तोडफोड करण्यात आली आहे. तीच पद्धत प्रारूप मतदारयादी तयार करताना वापरली गेली आहे. यासाठी जिल्हा तसेच महापालिका प्रशासनावर सत्ताधारी पक्षांतील मंडळी दडपण आणत निवडणुकांसाठी हवे ते करुन घेत असल्याचा आरोप कळमकर यांनी केला. प्रारूप मतदारयादीची तपासणी केली असता या मतदारयादीत अनेक विसंगती आढळून आल्याचे त्यांनी मतदारयादी दाखवित सांगितले.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील चार हजारपेक्षा अधिक नावे समाविष्ट केली आहेत. याबाबत आम्ही हरकत दाखल केली. 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत हरकतीनुसार नावे वगळली न गेल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आपला लढा हा अहिल्यानगर शहरातील मतदारांच्या न्याय हक्कासाठी आहे. या मतदार यादीचा जो गोंधळ आहे याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
...तर दुबार मतदारांवर गुन्हे दाखल कराल का?
दुबार नावे मतदारयादीतून वगळता येत नाहीत असे निवडणूक आयोग सांगते. मात्र डबल वोटिंग झाल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करुन एक वर्षाची कारावासी शिक्षा ठोठावली जाते असे दुसरीकडे आयोग सांगत आहे. श्रीगोंदा मतदारसंघातील 4 हजारांपेक्षा अधिक मतदारांनी लोकसभा, विधानसभेत आणि महापालिकेत दुबार मतदान केलेले असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल का असा सवाल अभिषेक कळमकर यांनी निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासनाला केला आहे.
मतदारयादीत अनेक करामती
शेकडो मतदारांचे नाव एकाच पत्त्यावर आहे. काहींचे वय आणि मतदारयादीतील छायाचित्रांत तफावत दिसत आहे. महिला व पुरुष लिंग बदल ही करण्यात आला आहे. तीन महिलांच्या पतीचे नाव एकच असल्याचे मतदारयादीत दिसत आहे. काही मतदारांचे आडनावच गायब आहे. हिंदू व मुस्लिम मतदार हे एकाच घरात राहात असून ऐक्याचे प्रतीक या मतदारयादीतून पुढे आले. काही प्रभागातील दोनशे ते तीनशे नावे दुसऱ्या प्रभागात असे चित्र आहे. निवडणुकीत बोगस मतदान करुन घेण्यासाठीच मतदारयादीत विसंगती घडवून आणली गेली असा आरोप कळमकर यांनी केला.