

नगर: फिनिक्स फाऊंडेशनचे नेत्र शिबिर गरिबांसाठी आधार ठरत आहे. लाखो रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली आहे. या निःस्वार्थ सेवेचा लाभ 3 लाख 76 हजार गरजूंना मिळाला आहे. हे शिबिर घेत असताना कायम स्वरूपी सेवेच्या उद्देशाने फिनिक्सच्या माध्यमातून स्व. शिवाजीराव कर्डिले नेत्रालय उभारण्याच्या त्यांच्या संकल्पाला सर्वपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर ज्योतीताई गाडे यांनी दिले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर गाडे बोलत होत्या. यावेळी नगरसेविका गीतांजली काळे, आशाताई डागवाले, सुनिता भिंगारदिवे, पौर्णिमा गव्हाळे, नगरसेवक निखील वारे, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, योगीराज गाडे, पै. महेश लोंढे, मोहीत पंजाबी, अवधूत फुलसौंदर, ह.भ.प. कोऱ्हे महाराज, फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड, माजी सरपंच राम पानमळकर, सोनू भुजबळ, मयुर पाखरे, संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा चौधरी, साहित्यिक सुनील राऊत आदी उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, शेतकरी व गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे दृष्टिदोष दूर करुन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशन करत आहे. सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सण-उत्सव फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने साजरे करून दर महिन्याला या शिबिराचे आयोजन केले जाते. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरू असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली. या शिबिरात 417 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 63 शिबीरार्थींवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
गरजू रुग्णांना अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुनील राऊत यांनी केले. आभार नेताजी भाबड व राजेंद्र बोरुडे यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी गौरव बोरुडे, ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, सौरभ बोरुडे, विशाल भिंगारदिवे यांनी परिश्रम घेतले.