

नगर: महापालिकेबद्दल नगरकरांमध्ये समाधान निर्माण व्हावे, यासाठी त्यांच्या दैनंदिन तक्रारींचे निराकरण तातडीने झाले पाहिजे. नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्यास प्रशासनावरील विश्वास कमी होतो. त्यामुळे प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. दैनंदिन कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महापौर ज्योतीताई गाडे यांनी दिला.
महानगरपालिकेचे नूतन महापौर ज्योतीताई गाडे आणि उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेत शहरातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, नगरसेवक सागर मुर्तडकर, नगरसचिव मेहर लहारे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शहर अभियंता मनोज पारखे, नगर रचनाकार यादव, वैभव जोशी, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, गणेश गाडळकर, आदित्य बल्लाळ, प्रभागाधिकारी एस. बी. तडवी, बाळासाहेब पवार, शंकर मिसाळ, अशोक साबळे, राकेश कोतकर आदी उपस्थित होते.
महापौर ज्योती गाडे म्हणाल्या, जन्म-मृत्यूचे दाखले डिजिटल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून गर्दी कमी होईल. विद्युत विभागात ऊर्जा बचत उपाययोजना करून खर्च कमी करावा. आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ वाढवावे. बांधकाम परवान्यांची प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीतून तातडीने पूर्ण करावी. बंद पडलेली उद्याने दुरुस्त करून पुन्हा नागरिकांसाठी खुली करावीत. पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक नियोजन करावे.
त्या म्हणाल्या, शहराचा सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल.
महापालिकेत महत्त्वाची पदे रिक्त
महापालिकेमध्ये उपायुक्त, ऑडिटर, कॅफो आणि शहर अभियंता यांसारखी काही महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही महापौर गाडे म्हणाल्या.
कार्यालयात वेळेवर हजर रहा: उपमहापौर जाधव
उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलीच कानउघडणी केली. ते म्हणाले, अनेक कर्मचारी दैनंदिन कामकाजात दिरंगाई करतात. सर्व कर्मचारी यांनी शासकीय वेळेनुसार कामकाज सुरू करावे. दुपारच्या विश्रांतीनंतर तातडीने कार्यालयात हजर राहावे आणि निर्धारित वेळेपूर्वी सुट्टी घेऊ नये. वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म आहे त्यांनी तो नेहमी परिधान करावा. आपले कार्यालय आणि प्रभाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी. नेहरू पुतळा परिसरातील जागेच्या प्रश्नाचे तातडीने निराकरण करावे. कापड बाजारात महिलांसाठी शौचालयाची तातडीने व्यवस्था करावी. त्या भागातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी योजना आखावी.
अनेक कामे अंतिम टप्प्यात: आयुक्त डांगे
शासनाच्या निधीतून शहरातील 24 रस्त्यांची कामे सुरू असून त्यापैकी 14 पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत शासनाने 44 कोटी रुपये अनुदान दिले असून मनपाने 15 कोटी रुपये स्वतःच्या निधीतून टाकले आहेत. नेहरू मार्केट प्रकल्पासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली असून, 70 ओटे व 60 दुकाने उभारली जाणार आहेत. सर्जेपुरा रंगभवनासोबत पार्किंग आणि सांस्कृतिक भवनाची कामे सुरू आहेत. दोन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. जिजामाता हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून सजावटीसाठी 10 कोटींचा निधी आवश्यक आहे. ई-बस डेपोचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यात 10 बस सुरू होणार आहेत. शहरात दररोज स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि मोकाट जनावरांवरील नियंत्रण मोहिमा राबवल्या जात आहेत, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.