

भेंडा: सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिंद्र बर्डे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून 31 हजारांची रोकड व आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथे मंगळवारी पहाटे हा दरोडा पडला.
जयश्री दौलत बर्डे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बर्डे यांचे भेंडा खुर्द-तरवडी रस्त्यावर घर आहे. प्रत्येक खोलीला स्वतंत्र दरवाजे आहेत. मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सासु विमलबाई यांनी आरडओरड करून घरात कोणीतरी घुसल्याचे सांगितले. पती दौलत बाहेर गेले असता त्यांना सासू विमलबाई व सासरे मच्छिंद्र असलेल्या खोलीचा दरवाजा तोडत असल्याचे दिसले.
प्रसंगावधान राखत त्यांनी मच्छिंद्र बर्डे यांना सुरक्षित खोलीत आणले व परवाना असलेली बंदूक हातात घेतली. त्याच वेळेस 4 ते 5 अनोळखी व्यक्ती अचानक घरात घुसल्या. त्यातील एकाने पिस्टलचा धाक दाखवुन पतीच्या हातातील रायफल हिसकावुन घेतली. दुसऱ्याने चाकुच्या मागच्या बाजुने पतीच्या कपाळावर मारहाण केली. इतरांनी चाकुचा धाक दाखवुन शांत राहण्याचा इशारा केला. दौलत यांचे हातपाय बांधून त्यांना जमिनीवर झोपवले.
दरोडेखोरांनी सासू, सासरे व मुलीस घराच्या कोपऱ्यात बसविले. खाली बसविले. एका दरोडेखोराने कपाटाच्या चाव्या मागितल्या. भितीपोटी जयश्री बर्डे यांनी चाव्या दिल्या. दरोडेखोरांनी कपाटे उघडून त्यातील सोन्याचे दागिने व रोकड काढून घेतली. दागिने टॉवलमध्ये गुंडाळून परवाना असलेली रायफल घेवून ते पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बाहेरून कडी लावून गेले
काही दरोडेखोर हिंदी तर काही मराठीत बोलत होते. त्यांनी बर्डे यांच्या कुटुंबातील सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले. सुमारे तासभर दरोडेखोर घरात होते. भितीपोटी बर्डे कुटुंब रात्रभर एकाच ठिकाणी बसून होते. तांबडं फुटतेवळी शेजारी दत्तात्रय क्षीरसागर यांना आवाज देत बोलविले. त्यांनी बाहेरून लावलेली कडी उघडल्यानंतर बर्डे कुटुंब बाहेर पडले. घराच्या अंगणात दोन मोबाईल पडल्याचे दिसून आले.