

नगर: अहिल्यानगर तालुक्यातील नारायणडोह व चिंचोडी पाटील येथे रविवारी (दि.22) पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दोन घरांवर सशस्त्र दरोडा घालून लूट केली. दोन्ही घटनांमध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरांनी 10 तोळ्यांचा ऐवज लुटून नेल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात रविवारी रात्री दरोडेखोरांनी सुदाम पवार यांच्या कुटुंबाला लक्ष केले. अंदाजे पाच दरोडेखारांनी पवार यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या घरातून 50 हजारांची रोकड व सुमारे अडीच तोळ्याचे दागिने असा एक लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेले. दरम्यान, जखमी सुदाम पवार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नारायणडोह शिवारात दोन वाजण्याच्या सुमारास पाच अनोळखी दरोडेखोरांनी साठे कुटुंबाच्या घरावर हल्ला करून मारहाण व लूट केली. या घटनेत पंढरीनाथ मारूती साठे (वय 45) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत त्यांची पत्नी प्रतिभा साठे (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरीनाथ साठे हे घराबाहेर धान्याजवळ झोपले होते. कुटुंबातील इतर सदस्य घरात झोपले होते. पहाटे दोनच्या सुमारास आरडाओरड ऐकू आल्याने प्रतिभा यांनी बाहेर पाहिले असता पाच व्यक्ती पती पंढरीनाथ यांना कोयता, काठ्या, लोखंडी कटावणी व चाकूच्या सहाय्याने मारहाण करीत असल्याचे दिसले. यानंतर दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने घराचा दरवाजा उचकावून आत प्रवेश केला.
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेतले. तसेच लोखंडी कपाट तोडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. विरोध करणार्या सासरे व मुलालाही काठ्यांनी मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी एकूण 2 लाख 17 हजार 500 रूपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिस अधिकारी घटनास्थळी
दरोड्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारूळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरू केला आहे.