

कोळपेवाडी: कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या मदतीने पद मिळविले असून त्यांचे पद रद्दसाठी अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादीचे सागर आहेर यांच्यावतीने ॲड. मुन्ना सय्यद यांनी दिली.
कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ हा प्रभाग एससी प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून निवडणूक लढवणारा उमेदवार हा एससी प्रवर्गातील असणे आवश्यक होते. परंतु या प्रभागातून नामनिर्देशनपत्र भरताना विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी त्यात जातीचा केलेला उल्लेखच चुकीचा आहे. वडिलांची जात मुलाच्या दाखल्यावर असते. वडिलांची आणि मुलाची जात वेगळी असे असू शकत नाही, अशी माहिती ॲड. मुन्ना सय्यद यांनी दिली.
जितेंद्र रणशूर यांच्या वडिलांच्या दाखल्यावर वेगळी जात आणि जितेंद्र रणशूर यांच्या दाखल्यावर वेगळी जात असल्याचे मिळालेल्या कागदपत्रातून समोर आले आहे. त्याच आधारे जितेंद्र रणशूर यांनी नामनिर्देशनपत्रात जातीबाबत खोटी माहिती दिली असल्याचे दिसून आल्याचे ॲड. सय्यद यांची म्हणणे आहे.
रणशूर यांची निवड बेकायदा असल्याचा दावा ॲड. सय्यद यांनी केला आहे. यासंदर्भात अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील दाखल केले असून न्यायालयातही अपील दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा न्यायालयात जावून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे योग्य वेळेत आणि शक्य तितक्या लवकर याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सत्तेतील काही नगरसेवकांनी अशाच प्रकारे खोटी माहिती दिलेली असून त्याची माहिती संकलीत केली जात आहे.
ॲड. मुन्ना सय्यद