

राहुरी/करंजी: मुळा धरणातून नुकतेच आवर्तन सोडलेल्या वांबोरी चारीची पाइपलाइन धामोरी खुर्द येथे रेल्वेलाईनजवळ फुटली आणि कित्येक फूट उंचीचे कारंजे तयार होऊन हजारो लिटर पाणी नजीकच्या शेतीत शिरले. त्यात अंदाजे वीस हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, 25 ते 30 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार अमित पवार यांनी दिली. दरम्यान, महसूल व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाने तातडीने वांबोरी चारीचे आवर्तन थांबवले.
वांबोरी चारीला 4 फेबु्रवारी रोजी आवर्तन सोडण्यात आले होती. राहुरी हद्दीतील वांबोरी येथील तलाव तसेच मिरी हद्दीतील तलावांमध्ये पाणी पोहोचले होते. पूर्वी दोन पंप सुरू होते. सोमवारी (दि. 9) तिसरा पंप सुरू केला होता. त्यामुळे चारीच्या पाइपलाइनमधून 70 क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. प्रवाहाचा दबाव वाढल्याने गळती झालेल्या धामोरी खुर्द हद्दीतील स्टेशन येथे मेन लाईन फुटली. त्यात कित्येक फूट उंच कारंजे उडताना दिसले. काही क्षणातच लगतचे शेती क्षेत्र पाण्याने व्यापले. जोरदार दाबाने आकाशात उंचच उंच उडणारे पाण्याचे भले मोठे कारंजे दूरवरून दिसल्याने शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. लाखो लिटर पाणी शेतातून वाहत असताना उभी पिकेही त्यात बुडाली, काही वाहून जाताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. चारी फुटल्याचे समजताच मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील यांनी तत्काळ आवर्तन बंद करण्याचे आदेश दिले.
मुळा धरणामध्ये सध्या 21 हजार 783 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यामध्ये 17 हजार 283 दशलक्ष घनफूट जिवंत साठा आहे. नुकतेच धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतकऱ्यांना रब्बीचे पहिले आवर्तन पार पडले. वांबोरी चारीवर जिरायत क्षेत्रातील 102 तलावांमध्ये पाणी सोडले जाते. दुष्काळी पट्ट्यासाठी वांबोरी चारी अत्यंत महत्त्वाची आहे. सुमारे 3 हजार 568 हेक्टर क्षेत्राला संजीवनी देणारी वांबोरी चारी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे वांबोरी चारीतून 16.54 दलघफू पाणी खर्च झाले आहे. अजूनही अनेक तलावांमध्ये पाणी पोहोच होणे बाकी आहे. पाइपलाइन फुटल्याने आवर्तन थांबविण्यात आले आहे. आता पाइपलाइन दुरुस्त होऊन चारी पुन्हा कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
वांबोरी चारीची जुनाट पद्धतीची पाइपलाइन आहे. 10 ते 12 फूट खोलपर्यंत ती गाडलेली आहे. चारी फुटलेल्या ठिकाणी ओल असल्याने नेमके कारण अजून स्पष्ट नाही. 2 ते 3 दिवसांत ओल ओसरल्यानंतर खोदाई करून तत्काळ दुरुस्ती केली जाईल आणि चारी पुन्हा कार्यान्वित होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
प्राथमिक अहवाल सुपूर्द: तहसीलदार
महसूल प्रशासनाकडून मंडलाधिकारी व तलाठी यांनी पाईप लाईन फुटल्यानंतर तातडीने धाव घेतली. नुकसान झालेल्या क्षेत्राचा प्राथमिक अहवाल पाटबंधारे विभागाला सुपूर्द केला आहे. कृषी विभागामार्फत नुकसानीची सविस्तर आकडेवारी तयार करण्याचे आदेश दिलेले आहे. अजूनही ओलावा अधिक असल्याने नुकसानीची निश्चित आकडेवारी मिळवण्याचे आदेश दिले असल्याचे तहसीलदार अमित पवार यांनी सांगितले.
पाहणीनंतर प्रस्ताव देऊ:पाटील
पाइपलाइन फुटल्याने शेतकऱ्यांचे व वांबोरी चारीचे नुकसान झाले आहे. पाहणी करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.