नगर: महापालिका निवडणुकीतील नगरसेवकांची नावे आज मंगळवारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर गटनोंदणीची पुढची प्रक्रिया राष्ट्रवादी-भाजपकडून बुधवारी (दि. 21) पूर्ण केली जाणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी केली जाणार आहे. दोन्ही पक्षांचे 52 नगरसेवक ‘राजयोग’वर जमा होतील, तेथून एकत्रितपणे गटनोंदणीसाठी नाशिकला विभागीय आयुक्तांकडे जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसला 27 व भाजपला 25 जागा मिळाल्या. त्यामुळे त्यांचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. विजयी उमेदवारांची नावे समाविष्ट करून अधिकृत राजपत्र मंगळवारी (दि. 20) प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये गटनोंदणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे जाऊन गट नोंदणी करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 27, तर भाजपकडे 25 संख्याबळ आहे. शिवसेनेकडे 10 नगरसेवक आहेत. सर्वच पक्ष विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करून तसेच पत्र महापालिका आयुक्तांकडे सादर करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुुळे त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा आहे. राष्ट्रवादी-भाजपची गट नोंदणीसाठी बुधवारी सकाळी राजयोग हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. त्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या गटनेते पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे रीतसर गटनोंदणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिका महापौर पदाची आरक्षण सोडत गुरुवारी झाल्यानंतर महापौर निवडीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची आज बैठक
शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले आहेत. या दहा नगरसेवकांची बैठक बुधवारी होणार आहे. त्यात गटनेते पदावर चर्चा होऊन नोंदणीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. यापूर्वी दहा वर्षे शिवसेनेचे गटनेते म्हणून संजय शेंडगे यांची निवड झाली होती. आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाशिकलाच कळणार नाव?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 27 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर गटनेते होते. आता गटनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा शहरात सुरू आहे. भाजपकडे 25 नगरसेवक आहे. गतवेळी मालन ढोणे गटनेत्या होत्या. गटनेता कोण? याची माहिती एकाही नगरसेवकाला नाही. ‘राजयोग’वरून नगरसेवक एकत्रित नाशिककडे जाण्यासाठी गाडीत बसतील, गाडीत किंवा नाशिकला पोहचल्यानंतर गटनेते पदासाठीचे नाव जाहीर केले जाणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचा गटनेता कोण, याची सर्वांना उत्सुकता आहे.
पक्षानुसार होणार गटनोंदणी
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती करून निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे गटनोंदणीही एकत्रित करतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी स्वतंत्र गटनोंदणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.