

नेवासा: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे उसाची वाहतूक जोरात चालू आहे. ओव्हरलोड व धोकादायक ऊस वाहतूक होत असतानाही आरटीओ विभागाने झोपेचे सोंग घेतलेले दिसत आहे. महामार्गावर अवजड वाहनांच्या कारवाईकडे आरटीओ विभागाचे लक्ष असतानाच तालुक्यात धोकादायक व नियमांची पायमल्ली होत असतानाही आरटीओ विभाग साखरझोपेत आहे. त्यामुळे धोकादायक ऊस वाहतुकीमुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या धूमधडाक्यात सुरू झाला आहे. कारखान्यांकडे ऊस नेण्यासाठी शेतकरी वर्ग ऊस मास्तर व कारखाना अधिकाऱ्यांकडे चकरा मारताना दिसत आहे. तालुक्यात मुळा व ज्ञानेश्वर साखर कारखाने आहेत. आता वरखेड भागातही तिसरा साखर कारखाना सुरू झालेला आहे. उसाची उपलब्धताही यावेळी मोठ्या प्रमाणावर तालुक्यात आहे. यंदा उसाची पळवापळवी होताना दिसत नाही. ऊस वाहतूक होताना नियमांची ऐशी की तैशी होताना दिसत आहे. जादा वजनाच्या हव्यासापोटी एका ट्रॅक्टरला दोन-दोन ट्रॅली लावून व प्रमाणापेक्षा अधिक ऊस वाहतूक होत आहे. रस्त्यावर चालताना हे वाहन रस्त्याच्या खाली उतरत नसल्याने इतर वाहनधारकांबरोबर शाब्दिक चकमकीसह धरपकडीच्या घटना होत आहेत.
ट्रॅक्टरवरही टेपरेकॉर्डरचा आवाज मोठा असल्याकारणाने वाहनचालकाच्या मग्रुरीमुळे मारहाणीचे प्रकार होत आहे. ऊस वाहतुकीची वर्दळ वाढलेली आहे. अधिक ऊस भरून जाण्याचा सपाटा होत असल्याने स्वतःचा व दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालून ट्रक, ट्रॅक्टरमधून धोकादायक ऊस वाहतुकीने अनेकांची झोप उडवली आहे. काही वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होतात. अनेक वाहनांमधून ऊस रस्त्यावर पडतो. त्यामुळे मागील वाहनांना धोका होऊन दुचाकीस्वार अपघाताचे बळी ठरत आहेत. नेवासा फाटा, भेंडा, कुकाणा, सोनई आदी भागांत अपघात झालेले आहेत. वाहतूक कोंडी सतत होत आहे.
नियमानुसार 12 ते 15 टन ट्रकमधून 8 टन ट्रॅक्टर व बैलगाडीतून दीड टनापर्यंत ऊस वाहतूक केली जाऊ शकते. परंतु बहुतेक वेळा यापेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात असल्याचे दिसत आहे. रस्ता लहान, त्यातच दोन अवजड वाहने समोरासमोर आल्यानंतर त्यात ऊस वाहतूक गाडी अशा विचित्र कोंडीमध्ये नागरिक सापडत आहे. तालुक्यात रस्त्यांचे तीनतेरा वाजल्याने ठिकठिकाणी खड्डे व डांबरी कपारी उंच त्यामुळे कसरत करावी लागते. ऊस वाहतुकीच्या वाहनजवळून जातांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
जास्त ऊस वाहून आणण्याची चढाओढ
वाहनामध्ये जास्त ऊस वाहून आणण्याची चढाओढ असते. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडीत काढले जातात. पंचवीस ते तीस टनापर्यंत उसाची वाहतूक ट्रॅक्टर व ट्रकमधून केली जाते. एवढेच नाही तर एका ट्रॉलीला दुसरी ट्रॉली जोडून ऊस वाहतूक होत आहे. त्यामुळे अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.