

संदीप रोडे
बहुमत मिळाले नसले तरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा अनपेक्षित विजय म्हणजे शिवसेनेने (शिंदे) नेवासा, शेवगावात पहिल्यादाच जिल्ह्याच्या शहरी भागात पायाभरणी केली. नेवासा, शेवगावचे निकाल वगळता अन्य 10 नगरपालिकांमध्ये अपेक्षेप्रमाणे किल्लेदारांनी गड राखण्यात यश मिळविले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असलेली भाजपची कमान आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी तीर सोडत महाविकास आघाडीवर निशाना साधला. विखे पिता-पुत्राची प्रचाराची फुगडी रंगल्याने जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या सात जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र शहरी मतदारांनी साफ नाकारल्याचे चित्र या निकालानंतर समोर आले. श्रीरामपूऱ, संगमनेर आणि राहुरी काबीज करण्याचे महायुतीचे स्वप्न मात्र अधुरे राहिले असले तरी भविष्यात ही संधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिळणार आहे. पालकमंत्री_ राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील शिर्डी व राहाता नगरपालिकेवर निविर्वाद वर्चस्व सिद्ध केले. सोबतच जिल्ह्यातील सात नगरपालिकांचे नगराध्यक्षपद जिंकून विखे पाटील यांचे जिल्ह्यावरील वर्चस्वही अधोरेखित झाले.
श्रीगोंद्यात नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवत नवोदित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी भाजपचे स्थान भक्कम केले. आ. पाचपुते यांच्या पराभवासाठी विरोधकांनी वज्रमूठ बांधूनही पाचपुते यांनी मिळविलेले यश नेत्रदीपक मानले जाते. नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जामखेडचे मैदान मारले. राजकीय प्रतिस्पर्धी आ. रोहित पवार यांच्या राष्ट्रवादीचे (शप) पानिपत करत आ. शिंदे यांनी जामखेडची सत्ता एकहाती मिळविण्यात बाजी मारली. आ. मोनिका राजळे यांची पाथर्डीवरील पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली, मात्र त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील शेवगाव पालिकेतील पराभव म्हणजे एक प्रकारे आगामी राजकीय संघर्षाची नांदीही ठरणारा असाच आहे. भाजपांतर्गत वादातून प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी ऐन वेळी शिंदे सेनेचा बाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवत अरुण मुंडे यांनी पत्नी माया मुंडे यांच्या रूपाने शेवगावात पहिल्यादांच भगवा फडकावला. देवळाली प्रवरा येथे भाजपच्या सत्यजित कदम यांच्यावर विश्वास दाखवत जनतेने त्यांच्या हाती सत्तेची धुरा सोपविली. कोपरगावात पक्षीय नव्हे तर काळे व कोल्हे या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांतील लढाई जिंकत विवेक कोल्हे यांनी चुणूक दाखविली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी राजकीय पटलावर अनेक डाव टाकत कोल्हेंची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र आ. काळे यांच्या चक्रव्यूहातून कोल्हे अलगद सटकले अन् कोपरगाववर विजयाचा झेंडा फडकावण्यात यश मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हेंच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. काळे यांच्या मागे पाठबळ उभे केल्यानंतर लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. चुरशीच्या लढतीत कोल्हे समर्थक पराग संधान यांनी कमळ फुलविल्याने कोल्हेंना नव‘संजीवनी’ दिली.
श्रीरामपूरचा कौल काँग्रेसलाच
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ज्या श्रीरामपूरकडे पाहिले जाते, तेथे काँग्रेसचा पराभव करण्याकरिता मंत्री विखे पाटील यांनी राजकीय डाव टाकले. काँग्रेसचे नगरसेवक फोडून त्यांचा भाजपप्रवेश करविला. मात्र महायुती एकसंघ ठेवण्यात विखे पाटलांना अपयश आले. परिणामी विखे पाटलांचे डावपेच उलटवून लावण्याची संधी करण ससाणे यांना मिळाली. श्रीरामपूर अन् काँग्रेस हे समीकरण कायम राखण्यात ससाणे यांनी यश मिळविले. दिवंगत आमदार जयंत ससाणे यांचे श्रीरामपूरवर असलेले एकहाती वर्चस्व करण ससाणे यांच्या नगराध्यक्षपदाच्या विजयाने आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. माजी नगराध्यक्ष अनुराधा अदिक यांचा धक्कादायक पराभव राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करणारा ठरला.
संगमनेरात ‘सिंह’गर्जना
बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर संगमनेरात महायुतीचा सुसाट रथ थोरात-तांबे जोडगोळीने रोखला. एकहाती गड राखतानाच आ. सत्यजित तांबे यांच्या नवनेतृत्वाचा संगमनेरात उदय झाला. डॉ. मैथिली यांच्या रुपाने तांबे यांच्या दुसऱ्या पिढीकडे संगमनेरचे नेतृत्व सोपवले गेले. विधानपरिषद निवडणुकीतही ‘हात’चा राखत अपक्ष लढलेले आमदार सत्यजित तांबे यांनी ‘हात’ बाजूला करत सेवा समितीच्या माध्यमातून ‘सिंह’गर्जना केली (बाळासाहेब थोरात यांनी पहिली 1985 ची निवडणूक अपक्ष लढताना ‘सिंह’गर्जना केल्याची आठवण या निमित्ताने). माजी मंत्री थोरात यांनीही संगमनेरची सगळी सूत्रे आ. सत्यजित यांच्या हाती दिली, रिमोट मात्र स्वत:कडेच ठेवला. त्याचा परिणाम म्हणून संगमनेर काबीज करू पाहणाऱ्या महायुतीचा पराभव झाला.
राहुरीत पुन्हा तनपुरेंवर विश्वास
विधानसभेतील पराभवानंतर काहीसे बॅकफूटवर गेलेल्या प्राजक्त तनपुरेंना साखर कारखान्याच्या सत्तेनंतर तरतरी आली. पालिकेत राहुरीकरांनी पुन्हा एकदा तनपुरे कुटुंबीयावर विश्वास टाकत सत्ता दिली. दिवगंत आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशिवाय झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला मोठी किंमत मोजावी लागली. विखे पिता-पुत्रांनी लक्ष घालूनही राहुरी भाजपला ताब्यात घेता आली नाही. या निकालाने आगामी विधानसभेच्या पोटनिवडणुकीवर परिणाम होऊ शकतात, याचे संकेतही दिले गेले. राहुरीत महायुती एकसंघ राहिली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते, पण महायुतीतील बिघाडी माजी मंत्री तनपुरे यांच्या पथ्यावर पडली.
शिवसेनेचे स्थान अधोरेखित
मतदानापूर्वी काही तास अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवासा व शेवगाव, कोपरगाव, देवळाली प्रवरा, संगमनेर, श्रीरामपूरात सभा घेतल्या. यातील नेवासा व शेवगावात शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. नेवासा वगळता इतर पाच ठिकाणी शिवसेनेचा सामना महायुतीतील राष्ट्रवादी, भाजपाशी झाला. जिल्ह्यात अहिल्यानगर शहरापुरतीच सीमित असलेली शिवसेना नगरपालिकेच्या माध्यमातून आता गावखेड्यापर्यंत पोहचली आहे. शिंदेंचा करिष्मा अन् शिवसेनेचा विस्तार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झालेला पराभव पाहता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत जागावाटपात शिवसेनेचे स्थान अधोरेखित झाल्यास नवल वाटू नये.