

जामखेड: जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग 2 ब व 4 ब या दोन प्रभागांत शनिवारी शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण 5362 मतदारांपैकी 4028 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तब्बल 75.12 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये 2444 तर प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये 1584 मतदारांनी मतदान केले. या दोन प्रभागांच्या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, उद्या 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. आमदार रोहित पवार व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रत्यक्ष घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला होता. त्यामुळे मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उद्याच्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
तीन पिढ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
शहरातील ल. ना. होशिंग मतदान केंद्रावर लोकशाहीचा जिवंत अनुभव पाहायला मिळाला. पत्रकार नासीर पठाण, त्यांची मातोश्री व मुलगी अशा पठाण कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकत्र येत मतदान केले. कमरुन्निशा आयुबखान पठाण (आई), नासीरखान आयुबखान पठाण (मुलगा), दानिया नासीरखान पठाण (नात) यांनी मतदान केले. या दृश्यामुळे मतदानाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला.
नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 75.12 टक्के मतदानाची नोंद केली. विशेष म्हणजे नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करीत लोकशाहीचा उत्सव अधिक बळकट केला. दिवसभर जामखेड शहरात मतदान शांततेत पार पडले.
आज मतमोजणी; कडक बंदोबस्त
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी (दि. 21) सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी श्री. नागेश्वर सामाजिक सभागृह, जामखेड येथे केंद्र निश्चित करण्यात आले आहे.