नगर: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज पाचव्या दिवसाखेर 40 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल़ केले. सर्वाधिक अर्ज केडगाव उपनगरातून भरण्यात आले मात्र, तिथे सर्वांनीच अपक्षाची चाल खेळली तर, सावेडीमधून माजी नगरसेवकांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरले आहेत. केडगावातून अनेकांनी अपक्ष अर्ज भरल्याने तर्कविर्तक काढले जात आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्री व भरण्यास प्रारंभ झाला. 17 प्रभागातील इच्छुकांसाठी सहा ठिकाणी अर्ज भरण्याची व अर्ज खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिला अर्ज ॲड. धनंजय जाधव यांनी दाखल केला. चौथ्या दिवशी दहा जणांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यात माजी नगरसेव महेश तवले, विजय पठारे व अमोल येवले, दिपाली बारस्कर यांचा समावेश होता. अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी तब्बल 29 जणांनी अर्ज भरले. त्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, दिपाली बारस्कर, मीना चोपडा यांनी अर्ज भरले. केडगाव उपनगरातील सर्वाधिक अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत.
दरम्यान, उद्या रविवारी असल्याने सोमवारी अर्ज दाखल करण्यास प्रचंड गर्दी होणार आहे. कारण आतापर्यंत इच्छुकांनी 1720 अर्ज नेले आहेत. इच्छुकांना 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 31 डिसेंबर रोजी छाननी होणार असून 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे.
यांची उमेदवारी दाखल
प्रभाग 1 डॉ. सागर बोरूडे, दिपाली नितीन बारस्कर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), प्रभाग चार शहेनाज खालिद शेख, सय्यद शाहबाज अहमद, खान मिनाज जाफर, खान समद वहाब (एमआयएम), प्रभाग 5 दामिनी अनिल शेकटकर, अविनाश श्रीधर साठे, प्रभाग 6- वीणा श्रीनिवास बोज्जा, श्रीनिवास सुरेश बोज्जा, प्रभाग 7 विलास राधाजी माने, प्रिया विकास माने (अपक्ष), पल्लवी दत्तात्रय जाधव (भाजप), प्रभाग 10- ऋषिकेश कीर्ती गुंडला, ऋषिकेश बालय्या गुंडला (अपक्ष), प्रभाग 11 सागर किरण शिंदे (अपक्ष), प्रभाग 14 मळू लक्ष्मण गाडळकर (राष्ट्रवादी काँग्रेस), मीना संजय चोपडा (राष्ट्रवादी काँग्रेस), सुरेखा संतोष घरवाढवे, श्रुतिका हरिश भांबरे (अपक्ष), संतोष डॅनियल घारवाढवे (अपक्ष), प्रभाग 16 अश्विनी विशाल पाचारणे (अपक्ष), सुनिता महेंद्र कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), हर्षवर्धन महादेव कोतकर (शिवसेना उबाठा), प्रभाग 17 आण्णासाहेब शिंदे (अपक्ष), पूनम सोन्याबापू घेंबूड (अपक्ष), कमल जालिंदर कोतकर (अपक्ष), अंबरनाथ तुकाराम भालसिंग (अपक्ष), दत्तात्रेय पंडित खैरे (अपक्ष)
आतापर्यंची अर्ज विक्री
तहसील कार्यालय सावेडी -282
प्रभाग समिती एक सावेडी -307
भूसंपादन कार्यालय सावेडी -165
जुने मनपा कार्यालय- 329
प्रभाग समिती 4, बुरूडगाव -301
केडगाव उपकार्यालय- 336