

सोनगाव: ओढ्यावरील अर्धवट पूल, उकरून ठेवलेला रस्ता आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने सात्रळ ते चणेगाव मार्गावर दररोज छोटे मोठे अपघात सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम राहुरी उपविभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनू लागल्याची संतप्त भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
सात्रळ-चणेगाव मार्ग हा दोन तालुक्यांतील अनेक गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असून या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, राहुरी उपविभाग यांच्या अखत्यारीत मंजूर झाले होते.
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उद्घाटनही झाले. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने काम सुरू करून ते अर्धवट अवस्थेतच सोडले असून, त्यानंतर कोणतीही प्रभावी देखरेख विभागाकडून करण्यात आलेली नाही. विशेषतः सात्रळ-चणेगाव आंब्याचा ओढा परिसरात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्याचा भाग वाहून गेला असून तेथे केवळ अर्धवट पूल शिल्लक आहे.
पुलावर संरक्षक कठडे, सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा धोक्याच्या खुणा नसल्याने रात्रीच्या वेळी हा भाग अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
दरम्यान, काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदाराला तत्काळ काळ्या यादीत टाकावे, आंब्याच्या ओढ्यावरील पुलाचे काँक्रीटीकरण करून रस्त्याची उंची वाढवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.