

डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: अहिल्यानगर महापालिकेची 26 फेब्रुवारी रोजी विशेष सभा होत असून, त्यात स्थायी समिती, बालकल्याण समिती व स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी नावे हायकमांड देणार असल्याचे बोलले जाते. परंतु, शिवसेनेमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेची प्रमुख पदे असणाऱ्या आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्वीकृतसाठी ताकद लावली आहे.
स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी 26 फेबु्रवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना पक्षाचे गट नेते बंद पाकिटात स्वीकृत सदस्यांची नावे देणार आहेत. त्यानुसार महापौर स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची घोषणा करणार आहेत. भाजप, राष्ट्रवादीत स्वीकृत निवडीची सूत्र हायकमांड असल्याने अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर, शिवसेनेच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवक एक जागा त्यांच्या वाट्याला आली आहे. त्यासाठी अनेकजण इच्छुक असून, वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीच जागा वाटपाच तांगडं काही जागांवर अडलं अन् शिवसेना स्वतंत्र लढली. या लढाईत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव यांचा पराभव पत्करावा लागला. त्यात निवडणूक झाल्यानंतर शहरप्रमुख सचिन जाधव यांचे पद काढून माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांना देण्यात आले. त्या वेळी पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.
दुसरीकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख सचिन जाधव, विक्रम राठोड, पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. त्यातील अनेकांनी इच्छुक असल्याचे बोलून दाखविले असून, त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेत स्वीकृत नगरसेवकाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
सगळं माळीवाड्यातच द्यायचं का?
शिवसेनेचे माळीवाडा भागातून चार नगरसेवक निवडून आले. त्यात ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय कावरे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजी कदम यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी बाळासाहेब बोराटे इच्छुक आहेत. तसेच पत्र गटनेत्यांनी महापौरांना दिले आहे. आता पुन्हा स्वीकृत नगरसेवकपदही माळीवाड्यात द्यायचे का, असा सवाल निष्ठावंत शिवसैनिकांमधून विचारला जात आहे.
निष्ठावान, ज्येष्ठांना संधी द्यावी
स्वीकृत नगरसेवकाची शिवसेनेच्या वाट्याला एकच जागा येत आहेत. त्यात माजी नगरसेवक व पक्षाची पदे त्यांच्याकडे असूनही ते इच्छुक आहेत. मात्र, पक्षाने ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिकाला संधी द्यावी, असा मतप्रवाह शिवसेनेत असून, तशी इच्छा एका नगरसेवकाने बोलून दाखविली.