

नगर : नगरच्या खेळाडूंना लवकरच वाडिया पार्क येथे जागतिक दर्जाच्या सर्व दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. त्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या 53 कोटी रुपयांच्या निधीपैकी 15 कोटींचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
वाडिया पार्क मैदानात त्याधुनिक सोयी-सुविधांसाठी राज्य सरकारने तब्बल 53 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुराव्यास यश आले असून मंजूर निधीतील 15 कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाला आहे. या निधीतून ही विकासकामे सुरू होत आहेत.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. सुजय विखे, आ. संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी पंकज आशिया, राज्याचे क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक युवराज नाईक आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, वाडिया पार्कमध्ये दर्जेदार सुविधांयुक्त मैदाने उपलब्ध होणार आहेत. अत्याधुनिक धावपट्टी, प्रकाशयोजना, प्रेक्षक गॅलरी, खेळाडूंसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छतागृहे व इतर पूरक सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे वाडियापार्क येथे अगदी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यास चालना मिळेल. ही बाब शहरासाठी अभिमानाची आहे.
जागतिक दर्जाचा ट्रॅक, मान्यताप्राप्त 15 मिमी जाडीचा 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक 8 लेनसह, क्रिकेटसाठी अत्याधुनिक खेळपट्टी, फ्रेश गार्डन सॉइल आणि फार्मयार्ड मॅन्युअर वापरून दर्जेदार लॉन, स्टेडियमच्या देखभालीसाठी 20 एच. पी.च्या मोटारसह आधुनिक पॉपअप स्प्रिंकलर सिस्टीम, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल मैदानावर स्ट्रक्चरल स्टील आणि कलर कोटेड शीट वापरून मजबूत ‘डोम रूफ’, कबड्डीची दोन व खो-खोची दोन मैदाने; त्यावरही डोम रूफ, अशा कामांचा अत्याधुनीकरणात समावेश असल्याची माहिती क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी दिली.