

नगर: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात दूध भेसळीवर कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याचा चुकीच्या काम करणाऱ्यांनी धसकाही घेतला आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात ह्या कारवाया पूर्णपणे थंडावल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातून खरोखर ‘भेसळ’ हद्दपार झाली की, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कारवाई गुलदस्त्यात ठेवली जात आहे, असे अनेक प्रश्न पुढे येताना दिसत आहे.
जामखेड येथून पकडलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटची अन्न व औषध प्रशासनाला भणकही नसल्याचे दिसले. मंचर दूध भेसळ प्रकरणातही नगरचे चार आरोपी सापडले. मात्र नगरच्या अन्न व औषध प्रशासनाला हेही माहिती नव्हते. त्याचे पुढे काय झाले, हेही समजू शकले नाही. त्यातच, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील कारवायाही मोठ्या प्रमाणात थांबल्याचे समजते. हे प्रशासनाचे की अन्य कोणाचे ‘यश’ आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अफवा की अन्य काही?
जिल्ह्यातील अनेक भागात गर्दीने ‘फुले’लेल्या हॉटेलवर छापे टाकल्याच्या बातम्या पसरत आहेत. स्थानिक पातळीवर आर्थिक आरोपही केले जात आहे. मात्र, आम्ही अशी कोणतीही कारवाई केली नाही, किंवा आम्ही तिकडे गेलोच नाही, असे उत्तर मिळत आहे. ह्या अफवा आहेत, की कारवाई गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रकार, याविषयीही चौकशीची मागणी होत आहे.
तीन सहायक आयुक्तांकडे जबाबदारी
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे तीन सहायक आयुक्त आहेत. यातील अपर्णा भोईटे यांच्याकडे श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरीचे निश्चित केलेल्या भागाची भेसळ प्रतिबंधक उपाययोजनांची जबाबदारी आहे. सहायक आयुक्त सोपान इंगळे यांच्याकडे संगमनेर, कर्जत, जामखेड, श्रोगोंदा, पारनेर व अकोले तालुक्यातील ‘त्या’ भागांतील प्रशासकीय जबाबदारी आहे.
याशिवाय, सहायक आयुक्त जगताप यांच्याकडे नगर तालुका, यासह नगर शहराची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या तीनही अधिकाऱ्यांव्दारे जिल्ह्यातील अन्न प्रशासनाची मोहीम राबवली जात आहे. संबंधितांनी अनेक कारवाया केल्याही, मात्र गेल्या आठवडाभरापासून कारवाई थांबल्याचे चित्र आहे.