

कर्जत: तालुक्यातील श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा साखर कारखाना दर्जेदार साखर उत्पादन, शेतकरी हितसंबंध जपणारे धोरण आणि काटेकोर नियोजनासाठी ओळखला जातो. 2024-25 या गळीत हंगामातही या कारखान्याने आपली परंपरा कायम ठेवत ऊसउत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ व विश्वासार्ह पेमेंट देण्याची अंमलबजावणी केली आहे.
या हंगामात कारखान्याने ऊसउत्पादकांना प्रतिटन 3100 रुपयांचा पहिला उचल अदा केला. 76 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे मुख्य संचालन अधिकारी जंगल वाघ यांनी दिली.
श्री वाघ म्हणाले, वेळेवर मिळणारे पैसे ही शेतकऱ्यांसाठी मोठी गरज असताना, अंबालिका शुगरने ती यावर्षीही पूर्ण केली आहे. एक विश्वासाचे नाते शेतकरी बांधवांच्या सोबत आम्ही तयार केले आहे.
अंबालिका शुगरने यंदाच्या गळीत हंगामात उत्कृष्ट दर्जाची साखर निर्मिती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि कुशल मनुष्यबळ यांचा योग्य समन्वय साधला आहे. कारखान्याच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आहे. ऊसतोडणी, वाहतूक, वजन काटा आणि गाळप या सर्व प्रक्रियांमध्ये नियोजनबद्ध कामकाज करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कारखान्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
कारखान्याचे व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचार्यांचे समन्वयपूर्ण काम, तसेच संचालक मंडळाचे मार्गदर्शन यामुळे अंबालिका शुगर हा विश्वासार्ह व शेतकरीकेंद्री कारखाना म्हणून ओळखला जातो. ऊसउत्पादकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जात असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसादही सकारात्मक आहे. एकूणच, दर्जेदार साखर उत्पादन, वेळेवर पेमेंट, नियोजनबद्ध गाळप आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे धोरण यामुळे श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा कर्जत तालुक्यातील आदर्श साखर कारखाना ठरत आहे. येत्या काळातही शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याचा विश्वास कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे.