

नगर: शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील एचडीएफसी बँकेसमोर किरकोळ कारणावरून पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून तिघांच्या मुसक्या आवळल्या. अन्य दोन पसार आरोपींच्या शोधाकामी पथक रवाना झाले आहे. हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक (वय २७, रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर), महेश उर्फ पप्पू दशरथ मते (वय २७, रा. सावेडी, अहिल्यानगर), प्रशांत शिवाजी निक्रड (वय २५, रा. सावेडी, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
२० ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार सुशील थोरात यांच्या मुलाच्या कारला दुचाकीस्वार आरोपी सोनू कोहक याने धडक दिली. पत्रकार सुशील थोरात यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपींविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड व त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी पहिलवानाने थोरात आणि त्यांच्या मुलावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. याबाबत पत्रकार सुशील थोरात यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तत्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक विकास जाधव, संदीप दरवडे, पोलिस अंमलदार संदीप पवार, योगेश भिंगारदिवे, अतुल लोटके, शाहीद शेख, राहुल द्वारके, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सुनील मालणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड यांची दोन पथके आरोपींच्या तपासाकामी रवाना केली.
तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. २४ ऑगस्ट रोजी आरोपी वाळूज, पंढरपूरजवळील एमआयडीसी (छत्रपती संभाजीनगर) येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी सराईत गुन्हेगार
दोन आरोपी सराईत गुन्हेगार ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी सोनू कोहक व प्रशांत निक्रड हे सराईत गुन्हेगार आहेत. सोनू कोहकवर यापूर्वी तोफखाना पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर, प्रशांत निक्रडवरही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.