

नगर: जिल्ह्यातील भेसळीवरील कारवायांमुळे चर्चेत आलेल्या अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल ते जून 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत दूध, दही, तूप, मिठाईच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 141 नमुने ताब्यात घेतले आहेत. गुटख्याबाबतच्या 24 कारवायांतून 68 लाखांचा आणि वेगवेगळ्या 19 जप्ती कारवायांतून 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, सर्वांत जास्त गाजत असलेल्या दूध भेसळीच्या संशयातून 39 दुधाचे नमुने स्वतंत्रपणे घेण्यात आले असून, त्याच्या प्रयोगशाळेतील अहवालाकडे नजरा आहेत. राज्यात अन्नसुरक्षा आणि दूध भेसळ रोखण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर जिल्ह्यातही ‘मे’ पासून कारवायांना ‘काहीशी’ गती येताना दिसत आहे.
एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सहायक आयुक्त भोईटे, इंगळे, जगताप यांच्या पथकाने दुग्धजन्य पदार्थ दही, तूप, मिठाई, आईसक्रीम इत्यादीचे 141 नमुने ताब्यात घेतले आहेत. 19 जप्तीच्या कारवाया करण्यात आल्या असून, यातून 30 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 24 ठिकाणी छापे टाकून वेगवेगळ्या नावाचा पानमसाला, गुटखा असा 67 लाख 93 हजारांचा माल जप्त केला आहे. तसेच भेसळीच्या संशयातून 39 दूध नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवालाकडे नजरा लागल्या आहेत.
तीन छाप्यांत 25 हजार लिटर दूध नष्ट
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनांनुसार दि. 10 ते 12 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवली. नगरच्या प्रशासनाने प्रियदर्शनी दूध संकलन केंद्र, आंबीलवाडीच्या वाहन क्रमांक एम.एच. 16, सीसी 5001 मधील 24,498 लिटर, जे बाजारभावानुसार 9,79,920 रुपये किमतीचे दूध, भेसळीच्या संशयातून नष्ट केले आहे. तसेच मेहकरी येथील सद्गुरू मिल्क कलेक्शन येथील 216 लिटर (10,048 रुपये) तसेच वीरभद्र डेअरी, सोनेवाडी येथून 948 लिटर दूध (36024 रुपये) अस्वच्छतेच्या ठिकाणी साठवणूक केली, तसेच संशयातून नष्ट करण्यात आले आहे. या तीनही ठिकाणाहून दुधाचे नमुने ताब्यात घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
पालकमंत्र्यांकडे धाव
दूध भेसळीविरोधातील कारवाईमुळे जे चुकीची कामे करतात त्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, डिग्री, फॅट कमी लागल्यास ते दूध स्वीकारू नये, असे प्रशासनाने फर्मान काढल्याने ज्या शेतकऱ्यांच्या दुधाला फॅट कमी आहे, त्या दुधाचे काय करायचे, असा प्रश्न पुढे आला आहे. जर दूध मागे पाठवले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे आणि घेतले तर कारवाई होणार आहे, या दुहेरी संकटात सापडलेले दूध संकलन केंद्र, तसेच प्लॅन्ट चालकांनी आता शेतकऱ्यांसमवेतच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आज (गुरुवारी) भेट घेण्याचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.