

नगर: पावसाअभावी जिल्ह्यातील ८ लाख १० हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका ९ लाख ३६ हजार २९४ शेतकर्यांना बसला आहे. शासनाच्या वतीने जिरायती पिकांना हेक्टरी ८ हजार ५००, बागायती पिकांना १२ हजार ५०० तर फळबागांना १७ हजार रुपये नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे. या बाधित शेतकर्यांना दिवाळीसाठी ५ हजार रुपये ॲडव्हान्स मिळणार आहेत.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. यंदा पावसाने दगा दिला. जुलै महिना सोडला तर जून, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या पावसावर शंभर टक्के पेरणी झाली. मात्र पिके वाढीसाठी आवश्यक असणार्या पावसाने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. परिणामी सोयाबीन, कापूस, बाजरी आदी पिकांबरोबरच इतर खरीप पिके वाया गेली.
शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी व महसूल विभागाने पंचनामे केले असून, शंभर टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील १ हजार ६१० महसुली गावांतील १० लाख ३ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे केले असता, तब्बल ८ लाख १० हजार ४६८ हेक्टर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे.
३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत दिली जात आहे. या नुकसानीपोटी बाधित शेतकर्यांना किती मदत अदा करावी लागणार याचे आकडेमोड करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. बाधित शेतकर्यांना आवश्यक त्या आर्थिक मदतीचा अहवाल लवकरच शासनाला पाठविला जाणार आहे.
दरम्यान, शासनाने नुकसानभरपाईपोटी ॲडव्हान्स ५ हजार रुपये बाधित शेतकर्यांना अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील ९ लाख ३६ हजार शेतकरी ५ हजार रुपये मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.