Ahilyanagar District Bank Election: नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग; मुंबईतील नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष

अर्ज माघारीपूर्वी शरद पवार, फडणवीस, शिंदे यांच्या भूमिकेकडे इच्छुकांचे लक्ष; विखे पाटील, थोरात आणि राम शिंदे यांच्या संभाव्य बैठकीतून तडजोडीचे संकेत?
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा बँकेच्या अर्ज माघारीचे काऊंटडाऊन जसे जसे जवळ येत आहे, तशा तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रस्थापित विरोधात विस्थापितांचा संघर्ष आता जिल्ह्यापर्यंत मर्यादित राहिला नसून, तो आता आपापल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या कोर्टात पोहचला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या आदेशाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सोमवारी मुंबईत वरिष्ठ नेत्यांची चर्चा होऊन ‘नगर’चा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. ‘त्या’ निर्णयानुसारच नगरमध्ये प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून समजले. त्यामुळे मुंबई आणि नगरमधील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Ahilyanagar District Bank
Mohatadevi Temple: मोहटादेवी गडावर लाखो भाविकांची मांदियाळी; दर्शनासाठी अलोट गर्दी

जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गेल्या पंचवार्षिकला 17 जागा बिनविरोध काढण्यात प्रस्थापितांना यश आले होते. मात्र, यावेळी संगमनेरच्या ‘त्या’ सर्वपक्षीय बैठकीचा ‘टायमिंग’ चुकला आणि त्यामुळेच बिनविरोधचे गणितही हुकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अर्ज माघारीच्या दोन दिवस अगोदरपर्यंत जास्तीत जास्त चार ते पाच जागा बिनविरोध होतील, असे वाटत असून, दोनशेपेक्षा अधिक अर्ज बाकी आहेत. आता नेमके कोणाला अर्ज काढायला लावायचे, त्यांची नाराजी कशी दूर करायची, त्यांना कोणता शब्द द्यायचा, यातून होणारे बंड कसे थोपवायचे, या चिंतेत प्रस्थापितांचे नेते आहेत. विस्थापितांमधूनही 11 ते 12 मतदार संघातील उमेदवारांची पुन्हा चाचपणी सुरू आहे. ‘21 तारखेपर्यंत आणि नंतर’ कोण आपल्यासोबत राहील, याची शहानिशा केली जात आहे.

Ahilyanagar District Bank
Hiware Bazar Water Shortage: हिवरे बाजारला ८.१७ कोटी लिटर पाण्याची तूट; काटकसरीने दुष्काळाचा सामना

शरद पवार मुख्यमंत्र्यांना फोन करणार?

गेल्या आठवड्यात खा. लंके यांनी शिष्टमंडळासह शरद पवारांची भेट घेतली होती. ते आज सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी सकाळी पुन्हा पवार यांची भेट घेणार आहेत. त्या वेळी शरद पवार हे स्वतः मुख्यमंत्री आणि थोरात यांच्याशी बोलणार असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे आज विखे पाटलांशी बोलणार!

शिवसेनेचे नेते सुजीत झावरे यांनी पारनेरच्या दुष्काळी परिस्थितीसह जिल्हा बँकेबाबत पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली. दरम्यान, सुप्रीया झावरे आणि नीरज मुरकुटे यांच्या दोन नावांसाठी शिंदे हे सोमवारी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलणार आहेत. त्यानंतर दुपारपर्यंत याबाबत नगरच्या शिवसैनिकांना निर्णय कळेल, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

Ahilyanagar District Bank
Abhishek Kalamkar Anticipatory Bail: माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

एक वेळ श्रीगोंद्यात तडजोड; पण पारनेर नाहीच!

वरिष्ठ पातळीवरून निर्णय झाला, तर एक वेळी श्रीगोंद्यात राहुल जगताप यांच्यासाठी तडजोड होऊ शकते; मात्र पारनेरमध्ये खा. नीलेश लंके यांना जागा सोडण्यास प्रस्थापितांमधील एका गटाचा अजूनही विरोध असल्याची चर्चा आहे. पारनेरचा निर्णय घेताना विद्यमान आमदार आ. काशीनाथ दाते यांनाही विचारात घ्यावे लागणार आहे. दरम्यान खा. लंके यांनी पुढारीशी बोलताना सांगितले, की काही लोकांना एकहाती वर्चस्व दाखवू असे वाटत असेल, तर आम्हीही निवडणुकीसाठी ताकदीने तयार आहोत.

Ahilyanagar District Bank
Godavari Water Protest: शेतकरी आंदोलनादरम्यान तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याची गोदावरीत उडी

सर्वच पक्षांत गट-तट; मतदारांमध्येही संभ्रम

जिल्हा बँकेची निवडणूक ही राजकीय पक्षांशिवाय लढवली जात असली तरी कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही मोठा संभ्रम आहे. भाजपाचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बँकेत मात्र दोन वेगळ्या प्रवाहात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे हे विस्थापित, तर आ. आशुतोष काळे, आ. काशीनाथ दाते, आ. संग्राम जगताप हे प्रस्थापित बनले आहे. काँग्रेसमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे विखेंसोबत असले तरी प्रताप शेळके यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतही खा. वाकचौरे, लोखंडे,आ. खताळ यांनी स्पष्ट भूमिका घेतली असली तरी आमदार विठठलराव लंघे अजुनही मौन सोडताना दिसत नाही. त्यामुळे सर्वच पक्षात गट-तट वाढल्याने कार्यकर्तेही नेमकं करायचं काय, असे गोंधळून गेले आहेत.

मंत्री विखे , थोरात अन् शिंदेंची मंगळवारी निर्णायक बैठक?

अर्ज माघारीची मुदत दि. 21 रोजी आहे. मुंबईत महायुतीतील नेत्यांच्या चर्चेनंतर, एक दिवस अगोदर, म्हणजे उद्या मंगळवार दि. 20 रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची महत्वपूर्ण संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत प्रस्थापित दोन पाऊले मागे येऊन विस्थापितांना सोबत घेतील का, नेते जरी एकत्र आले तरी अर्जांची संख्या पाहता इतर उमेदवार अर्ज माघारी घेतली का, अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news