

नगर: जिल्ह्यात राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी व नेवासा या पाच तालुक्यांत सरासरी ४९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. राहुरी तालुक्यात फक्त ३५.९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या पाच तालुक्यांवर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगाम हाती लागण्याची शक्यता मावळली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १४५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे.
मात्र पहिल्या आठवडा पावसाविनाच गेला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी ३०१.१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना २५४ मिलिमीटरची नोंद झाली. अपेक्षित पावसाच्या ८४ टक्के पावसाची नोंद असली तरी तो दमदार आणि सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांसाठी दिलासा देणारी परिस्थिती नाही.
जून महिन्यात पहिल्यापासूनच पावसाने हजरे लावली तर खरीप पेरणीस आणि भूजलपातळी वाढण्यास मदत होते. यंदा मात्र जून महिन्यात तुटीचा पाऊस झाला. त्यामुळे जून महिना पेरणीविना वाया गेला. जुलै महिन्याने मात्र जिल्ह्याला दिलासा दिला. १६६ टक्के म्हणजे १६१ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने खरीप पेरणीस मोठी मदत झाली. याच महिन्यात पाणलोट क्षेत्रातदेखील दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे, आढळा धरणे ओव्हरफ्लो होण्यास मदत झाली. मुळा धरणही ९५ टक्के भरले आहे.
खरीप पेरणी होऊन पिकांच्या वाढीसाठी ऑगस्ट महिन्यात पाऊस अपेक्षित असताना पावसाने ओढ दिली. बहुतांश ठिकाणी पावसाने महिनाभर ओढ दिली त्यामुळे खरीप पिके करपली आहेत. धरणांच्या आवर्तनावर अवलंबून असलेल्या ठिकाणी मात्र पिके बरी आहेत. मात्र त्या पिकांचे उत्पादन घटणार आहे.
चौदा तालुक्यांपैकी पाच तालुक्यांत पावसाची सरासरी ४९ टक्क्यांच्या आसपास आहे. राहुरी तालुक्यात सर्वात कमी ३५.९ टक्के पाऊस झाला आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर या चार तालुक्यांत सरासरी ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हे पाचही तालुके दुष्काळीच्या छायेत आहेत. या तालुक्यांत दमदार पावसाअभावी पिके जळू लागली असून, भूजलपातळी अधिक खालावली गेली असून, विहिरी आणि कूपनलिका लवकरच कोरड्याठाक होण्याची शक्यता आहे.
पावसाअभावी चारा उगवला नसल्याचे उपलब्ध चार्याची किंमती भडाकल्या आहेत.सप्टेंबर महिन्यात सरासरी १४५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. पहिला आठवडा कोरडाठाक गेला आहे. या महिन्यातही पावसाने दडी मारल्यास दुष्काळी परिस्थिती अटळ आहे.
पावसाची टक्केवारी
अहिल्यानगर : ६८.२, पारनेर: ८९.२, श्रीगोंदा : ९७.८, कर्जत : ९७.२, जामगेड ७२.२,शेवगाव :५१.४, पाथर्डी :५३.४, नेवासा :५२.४, राहुरी : ३५.९, संगमनेर :८९.३, अकोले :१४९.२, कोपरगाव :९०, श्रीरामपूर :४७.७, राहाता ६०.१.