

नगर: जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी विजयादशमीला प्रयत्नांची शिकस्त केली.
मात्र प्रत्येक तालुक्यात रुसवेफुगवे अन् नाराजीमुळे बिनविरोधावर कोणताच निर्णय झाला नाही. अकोले, राहुरी व पारनेर तसेच श्रीगोंदा या चार तालुक्यांतील सोसायटीच्या जागांसह अन्य सात जागांचा पेच काही केल्या सुटत नसल्याने बंद खोलीतील चर्चाही निष्फळ ठरली.
शिंदे-विखे-थोरात यांनी प्रारंभी येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांची प्राथमिक बैठक घेतली. त्यात बिनविरोधचा सूर आळवला गेला; पण काही वेळातच अकोले, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील तिढा समोर आला. त्यामुळे प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्याचे ठरले.
सभापती शिंदे, मंत्री विखे आणि थोरात यांनी स्वतंत्रपणे बंद दाराआड तालुकानिहाय चर्चा सुरू केली. अन्याय झाला, विचारात घेतले जात नाही, एवढ्या वेळी समोरच्यांनी थांबावे, मलाच संधी मिळावी, असे गाऱ्हाणे इच्छुकांनी नेत्यांसमोर मांडले.
त्यामुळे हा निर्माण झालेला पेच रात्री उशिरापर्यंत सुटला नव्हता. दरम्यान, सर्व बैठकांनंतर शिंदे- विखे-थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात सभापती शिंदे यांनी विखे पाटील यांच्याकडे सर्वाधिकार देत, तेच माघारीअगोदर उमेदवारांची नावे जाहीर करतील, असे सांगितले.
आता विखे पाटील यांनी तालुक्यातील उमेदवारी निश्चित असलेल्या नेत्यांवरच नाराजांच्या मनधरणीची जबाबदारी सोपविली.
त्यात रात्रीतून तोडघा निघेल आणि बँक बिनविरोध होईल, असा दावा केला जात असला तरी उमेदवारी डावलेल्या नेत्यांनी ऐन वेळी वेगळा निर्णय घेतला तर बँकेसाठी निवडणूक अपरिहार्य असल्याचे मानले जाते. आ. लहामटे, भांगरे वेगळ्या विचारात अकोले सोसायटी मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांना एकत्र बसविण्यात आले.
गतवेळी सोसायटी आणि अनुसूचित जाती-जमातीची जागा राष्ट्रवादीला होती, ती यंदाही मिळावी, अशी मागणी आ. लहामटे यांनी केली. त्यावर पिचड यांनी आता परिस्थिती बदलल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सोसायटीची जागा बिनविरोध करायची झाल्यास अनुसूचित जाती जमातीची जागाही बिनविरोध करण्याचा शब्द द्यावा, अशी अट लहामटे यांनी टाकली. अमित भांगरे यांनीही लहामटे यांची पाठराखण केली. आता लहामटे यांना काहीच मिळाले नाही, तर ते भांगरे यांना सोबत घेत वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेळकेंची गैरहजेरी, कर्डिले निघून गेले नगर सोसायटीत आ. अक्षय कर्डिले, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ यांचे अर्ज आहेत. आ कर्डिले हे सभागृहातील बैठक संपल्यानंतर मार्गस्थ झाले होते. तर, स्वतंत्र बैठकीला हराळ हे संपतराव म्हस्केसोबत आत होते. मात्र प्रताप शेळके आलेच नाहीत, त्यामुळे याबाबत निर्णय होऊ शकला नाही. राहुल जगताप आले, पण निर्णय वेटिंगवर ! श्रीगोंदा मतदारसंघातील माजी आमदार राहुल जगताप बैठकीला उपस्थित नव्हते. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना फोन लावला आणि बैठकीचा निरोप न पोहोचल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत 'लवकर या' अशी गळ घातली.
जगताप येईपर्यंत आ. विक्रमसिंह पाचपुते, राजेंद्र नागवडे हे वेटींगवर होते. त्यानंतर जगताप, पाचपुते, नागवडे यांना एकत्र बसवले. यावेळी कुकडी कारखान्यावरही चर्चा झाल्याचे समजले. श्रीगोंद्याचा निर्णय आज सकाळी होणार आहे.
जगताप यांच्याशिवाय येथे दत्ता पानसरे यांचाही अर्ज आहे. पानसरे काय भूमिका घेतात, यावर तेथील गणित अवलंबून आहे. तनपुरे-कदम दोघेही ठाम राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे आणि सत्यजित कदम यांच्यासमवेत श्रेष्ठींनी बंद दाराआड चर्चा केली. मात्र, दोघेही माघार घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांच्या चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या.
मात्र, तोडगा निघाला नाही. आ. तनपुरेंनी स्वतंत्रपणे मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली, त्यावर आज शेवटच्या दिवशी मंत्री विखे पाटील कदम यांच्याशी बोलणार आहेत. कदम चौथ्यांदा थांबणार की लढणार, याचा निर्णय आज होणार आहे.
तर सात जागांवर चिन्ह घेऊन लढायचे ? प्रस्थापित आणि विस्थापितांनीही बिनविरोधचा सूर आळवला, मात्र, हा राजकीय डावपेचाच भाग असल्याचीही चर्चा सुरू आहे. इच्छुकांची संख्या पाहता सात जागांवर बिनविरोध निवडणूक काहीशी अवघड आहे. त्यामुळे जर निवडणूक झाली तर या सात जागांवर एक चिन्ह घेऊन निवडणूक लढवायची, या पर्यायावरही चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजले.
शिंदे, विखे, थोरातांकडूनही फोनाफोनी ! शेतीपूरक, बिगरशेती, महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त, ओबीसी मतदार संघातील अर्जाचा अभ्यास करून, आपापल्या कार्यकर्त्यांना अर्ज माघारीसाठी समजूत काढण्याची जबाबदारी ही सभापती शिंदे, मंत्री विखे आणि थोरातांनीही घेतली आहे. त्यामुळे बैठक सुरू असतानाच, फोनाफोनी सुरू झाली होती.
'गोकुळ'ची पुनरावृत्ती ?
पारनेरमध्ये सोसायटी मतदारसघात खा. नीलेश लंके, आमदार काशीनाथ दाते, शिंदे, गीताजंली शेळके यांचे अर्ज आहेत खा. लंके यांनी सभागृहात प्राथमिक चचा सुरू असतानाच वॉकआऊट केले. मात्र, जाताना बँक बिनविरोध होत असेल तर आम्ही अर्ज काढून घेऊ, असे माध्यमांसा सांगितले. नगरमध्ये 'गोकुळ' ची पुनरावृ करायची का? या प्रश्नावर मात्र लंके यां होकारार्थी 'स्मित' करत निवडणुकीस स असल्याचे संकेत दिले.