

नगर: अंधश्रद्धेचा फायदा घेऊन नागरिकांना 'पैशांचा पाऊस' पाडण्याचे आमिष दाखवणारी व बनावट नोटांचा व्यवहार करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. बारामती (जि. पुणे) येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ९२ लाख ९ हजारांच्या नोटांसह एक कोटी ३ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश दिलीप शेवाळे (वय ३३, रा. बारामती, जि. पुणे), सुमित विकास चंदनशिवे (वय २५, रा. तांदूळवाडी, बारामती, जि. पुणे), सूरज वसंत कांबळे (वय २७, रा. झारगडवाडी, बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक वडगाव गुप्ता (ता. नगर) परिसरात पेट्रोलिंग करीत होते. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना २९ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली गणेश दिलीप शेवाळे व त्याचे साथीदार विनायक कॉलनी (वडगाव रोड) परिसरातील भाड्याच्या खोलीत बनावट नोटांचा साठा बाळगून आहेत.
त्यानुसार पोलिस पथकाने छापा घालून घराची झडती घेतली असता जिन्याखालील पिशवीत भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा व नोटा तयार करण्यासाठी लागणारे कोऱ्या कागदांचे बंडल आढळून आले. ५०० रुपये दराच्या १८,४१९ बनावट नोटा (९२,०९,५०० रुपये), बनावट नोटा बनवण्यासाठीचे कोरे कागद, पाच मोबाईल, अलिशान कार असा एक कोटी तीन लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मालेगाव येथून आणल्या बनावट नोटा
आरोपींकडे कसून चौकशी केली असता नागरिकांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढणे आणि बनावट नोटांचा वापर करून त्यांची फसवणूक करणे, असा यांचा मुख्य प्लॅन होता. आरोपी गणेश शेवाळे याने या बनावट नोटा त्याचे साथीदार प्रताप धुमाळ (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) व अशोक भिमराज दारकुंडे (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) यांच्या मदतीने मालेगाव येथील 'अम्मु' नावाच्या व्यक्तीकडून २५ हजार रुपये देऊन आणल्याची कबुली दिली. प्रताप धुमाळ, अशोक दारकुंडे, अम्मू यांचा पोलिस शोध घेत आहेत.